रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व पथक-उपपथकातील एकत्रितपणे नवीन नाव होमगार्ड नोंदणी रत्नागिरी शहर पथक, लांजा, राजापूर, देवरुख, साखरपा, खेड, मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण, अलोरे, खवटी, पोफळी पुरुष व महिला होमगार्डची सदस्य नोंदणी २६ ऑगस्ट २०१९ रोजी येथील पोलीस मुख्यालयात सकाळी ७ वाजल्यापासून आयोजित करण्यात आली आहे.नोंदणीसाठी शारिरीक पात्रता पुरुषांसाठी उंची १६२ सेंटिमीटर, १६०० मीटर धावणे व गोळा फेक चाचणी तसेच महिलांसाठी उंची १५० सेंटिमीटर, ८०० मीटर धावणे व गोळा फेक चाचणी देणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास, वयोमर्यादा २० ते ५० वर्षे (२८ आॅगस्ट २०१९ रोजी वयाची २० वर्षे पूर्ण झालेला असावा तसेच २५ ऑगस्ट २०१९ रोजी वयाची ५० वर्षे झालेला नसावा) अशी आहे.निवड होवून पात्र ठरलेले उमेदवार वेतनीय अथवा खाजगी सेवेत असतील तर कार्यालयाचे-मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक असल्यास संबंधित प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
उमेदवाराने नोंदणीसाठी स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची सर्व जबाबदारी उमेदवाराची राहील. इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.