लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तिवरे धरण फुटीतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग आला असून, आतापर्यंत २४ कुटुंबांचे पुनर्वसन अलोरे येथे करण्यात आले आहे. उर्वरित १३ कुटुंबांचे तिवरे गावातच पुनर्वसन हाेणार आहे, तर अन्य १४ कुटुंबांचे अलाेरे येथे पुनर्वसन केले जाणार आहे. आता तिवरेसह रिक्टोली, ओवळी, नांदिवसे, पेढांबे, पेढे, कोळकेवाडी येथील दरडग्रस्त भागातून पुनर्वसनाची मागणी जाेर धरू लागली आहे. या कुटुंबांना एकाच गृहप्रकल्पात सामावून घेण्यासाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.
तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटीच्या घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांसाठी पेढांबे येथे पुनर्वसनअंतर्गत घरे उभारण्यात आली आहेत. अलोरे येथील पाटबंधारे विभागाच्या जागेत पहिल्या टप्प्यात २४ घरे उभारली असून याआधी १३, तर आता ११ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले. अजून १४ कुटुंबांचे अलोरे येथे पुनर्वसन केले जाणार आहे. उर्वरित १३ कुटुंबांचे गावातच पुनर्वसन होणार आहे.
शहरातील गोवळकोट-कदमवाडी येथील १५ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. त्याच जोडीला आता दरडग्रस्त भागातील कुटुंबांकडून पुनर्वसनाची मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी त्या-त्या भागात भूगर्भतज्ज्ञांतर्फे तपासणी करून त्याचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाणार आहे.
-------------------------
एकाच ठिकाणी पुनर्वसन
पुनर्वसनाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यापेक्षा एकाच ठिकाणी मोठा गृहसंकुल प्रकल्प उभारण्यात यावा, अशी सूचना केली. त्यासाठी कमी जागा लागेल. शिवाय पुनर्वसनावरील खर्चही कमी होईल. त्यानुसार तातडीने शासकीय जागेचा शोध घेऊन तसा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
-------------------------
सहा वर्षे शाळेत वास्तव्य
शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील पंधरा कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. या कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन गोवळकोट जिल्हा परिषद शाळेत केले आहे. सहा वर्षे ते याचठिकाणी वास्तव्याला असून पुनर्वसनाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
---------------------------
सध्या दरडग्रस्त कुटुंबांच्या संख्येत वाढ हाेत आहे. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणाहून पुनर्वसनाची मागणी होऊ लागली आहे. मात्र, जोपर्यंत भूगर्भतज्ज्ञांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. या अहवालानंतरच पुनर्वसन प्रकल्पाविषयी निर्णय होणार आहे.
- तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार, चिपळूण.
----------------------
अलोरे येथे कुटुंबांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले असून, ते एक मॉडेल स्वरूपात आहे. शासकीय यंत्रणेने योग्य पद्धतीने सोडत राबवून प्रत्येकाला योग्य तो न्याय दिला आहे. याच धर्तीवर तालुक्यात पुनर्वसन प्रकल्प उभारावेत.
- तानाजी चव्हाण, लाभार्थी, चिपळूण.