या दुर्घटनेत ५४ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यापैकी २४ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जवळजवळ मार्गी लागला आहे. त्यातील काही घरं तयार झाली असून, लवकरच ताब्यात दिली जाणार आहेत. मात्र, ज्या कुटुंबीयांचे तिवरे गावातच पुनर्वसन होणार आहे, त्यांच्या जागेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्याठिकाणी २० गुंठे जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु, अद्याप त्याच्या खरेदीखताची प्रक्रिया सुरू आहे.
-------------------------
कंटेनरमध्ये दोन वर्षे रहिवास
ताप्तुरते पुनर्वसन करण्यासाठी कंटेनर केबीनचा पर्याय निवडण्यात आला. ६० लाख रुपये खर्चातून ३०० स्वेअर फुटाच्या १५ कंटेनरमध्ये बाधितांचे पुनर्वसन करण्यात आले. हॉल, रूम, किचन व बाथरूमची व्यवस्था असलेल्या या कंटेनरमध्ये आजही १५ कुटुंंबे राहात आहेत. त्यांना कायमस्वरूपी घरासाठी अलोरे येथे कोयना प्रकल्प वसाहतीत २४ घरे बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये त्यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
--------------------
‘सिद्धीविनायक नगरी’ होतेय सज्ज
दोन ठेकेदारांच्या माध्यमातून प्रत्येकी १२ घरं उभारली जात आहेत. त्यासाठी सिद्धीविनायक ट्रस्टमार्फत पहिल्या टप्प्यात ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे, तर अजून सहा कोटी रुपये या संस्थेकडून प्रकल्पासाठी मंजूर केले आहेत. सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी या ‘सिद्धीविनायक नगरी’ पुनर्वसनासाठी मंजूर केला आहे. अजूनही पेढांबे येथे १६ कुटुंबीयांचे पुनर्वसन बाकी आहे. त्यासाठी दुसऱ्या टप्प्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
--------------------------------
तिवरे धरणफुटीच्या घटनेला दोन वर्षे झाली. या घटनेनंतरचा काही कालावधी वाया गेला असला, तरी पेढांबे येथे सुरु असलेले पुनर्वसनाचे काम समाधानकारकपणे सुरु आहे. आतापर्यंत २४ घरांचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. अजूनही उर्वरित घरांचा प्रश्न कायम असून, तातडीने निविदा प्रक्रिया शासनाने राबवावी.
- तानाजी चव्हाण, तिवरे
-----------------------------
तिवरे धरण काँक्रिट पद्धतीने बांधणे सद्यस्थितीत शक्य नाही. ते खूप खर्चिक होणार असल्याने पुन्हा मातीचे धरण उभारले जाणार आहे. तसा प्रस्ताव तयार केला असून, तो मान्यतेसाठी सादर केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही प्रक्रिया लांबली. मात्र, लवकरच पुढील प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
- संकेत शेट्ये, जलसंधारण विभाग, चिपळूण.
घटनाक्रम -
- रात्री ८़ ३० वाजता प्रथम तिवरे धरण भरून वाहू लागलं.
- धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने तलाठ्यांकडून खबरदारीचा इशारा.
- रात्री ९.३० वाजता धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले.
- धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाणी घुसले होते.
- रात्री ११ वाजता शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल.
- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफची दोन पथके दाखल.
- अवघ्या २४ तासात १८ मृतदेह सापडले होते.
- तिवरे धरणापासून ३५ किलोमीटर अंतरावर वाशिष्ठी नदीत एका महिलेचा मृतदेह आढळला.
- बेपत्ता दुर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष) या चिमुकलीचा मृतदेह शेवटपर्यंत मिळाला नाही.
पाणी साठवण्याची क्षमता २,४५२ दशलक्ष घनफूट इतकी होती.
धरणाची लांबी ३०८ मीटर तर उंची २८ मीटर होती.
-----------------------------
दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे अनंत हरिभाऊ चव्हाण (६३), अनिता अनंत चव्हाण (५८), रणजित अनंत चव्हाण (१५), ऋतुजा अनंत चव्हाण (२५), दुर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष), आत्माराम धोंडू चव्हाण (७५), लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२), नंदाराम महादेव चव्हाण (६५), पांडुरंग धोंडू चव्हाण (५०), रवींद्र तुकाराम चव्हाण (५०), रेश्मा रवींद्र चव्हाण (४५), दशरथ रवींद्र चव्हाण (२०), वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८), अनुसिया सीताराम चव्हाण (७०), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५), बळीराम कृष्णा चव्हाण (५५), शारदा बळीराम चव्हाण (४८), संदेश विश्वास धाडवे (१८), सुशील विश्वास धाडवे (४८), रणजित काजवे (३०), राकेश घाणेकर (३०).