शिरगाव : तिवरे धरण फुटीत उदध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाचे काम सुरु करण्यात आले. येथे २४ घरांची उभारणी केली जाणार आहे.कोयना प्रकल्पामुळे नावारूपास आलेले आणि एकेकाळी गजबजलेले चिपळूण तालुक्यातील अलोरे गाव पुन्हा नव्या रुपात पाहावयास मिळणार आहे. एकेकाळी हजारो कामगार कर्मचारी कुटुंब राहिल्याने खूप मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. पण, अलिकडे १० वर्षे शासकीय कार्यालय आणि प्रकल्पातील तांत्रिक कामे संपल्याने वसाहत परिसर ओसाड पडला.
५० वर्षांपूर्वी संपादित जागेचे काय करायचे, याबाबत निर्णय झाला नाही. मात्र, तिवरे दुर्घटनेतील व्यक्तीसाठी २४ नवी घरे बांधून पुनर्वसन करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्यावर रिकाम्या जागेत असलेल्या पत्र्याच्या चाळी उदध्वस्त करून इमारत बांधकाम सुरू झाले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून तिवरे येथील बाधित कुटुंबीय कंटेनरमध्ये राहात आहेत. उन्हाळ्यात उष्म्यामुळे या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला होता. त्याशिवाय अन्य सोयी - सुविधांचा प्रश्नही वेळोवेळी निर्माण होत आहे. त्यामुळे अलोरे येथील पुनर्वसनाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी केली जात आहे.