रत्नागिरी : मानवी आयुष्य हे विविध कंगोऱ्यांनी युक्त आहे. आपल्या आजुबाजुला सातत्याने घडत असलेल्या प्रसंगांशी एकरुप होऊन त्या प्रसंगाची भावनिक अनुभूती घेतल्यास आपण उत्तम अशी साहित्यनिर्मिती करु शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘वाचक गट’ उपक्रमांतर्गत ‘लोक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात डॉ. जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्दितीय वर्ष कला शाखेतील रेणुका जोशी व बारावीचा विद्यार्थी अथर्व भावे यांनी मुलाखत घेतली.डॉ. जोशी यांचा शालेय जीवनापासून लेखन प्रवास सुरु झाला. महाविद्यालयीन जीवनात त्याला विस्तृत रुप प्राप्त झाले. सुरुवातीला आई-वडील आणि समाजातील तत्कालीन मान्यवरांनी त्यांच्या लेखनाला सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे सातत्याने घरच्या मंडळींनी लेखनाचे कौतुक केल्याने लेखनाला चालना मिळाली, असे जोशी म्हणाले. ‘शेंबी’ ही पहिली कादंबरी. या कादंबरीचे नावही त्यांच्या मातोश्रींनी सुचवले होते. त्यानंतर विविध अशा २५ साहित्यकृती लिहिल्या गेल्या. यामध्ये मार्शिलँड, कातळ, भोवरा इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ‘डेथ आॅफ कॉमन सेन्स’ या नभोनाट्याला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच आकाशवाणीकरिताही त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांनी संगीत नाटकांचीही निर्मिती केली आहे. यातील काही नाटकांना विविध स्तरावर पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. याखेरीज ललीत लेखन, विडंबन काव्य इत्यादी साहित्यही त्यांनी लिहिले आहे.आपल्याला शं. ना. नवरे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, जयवंत दळवी भावत असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात आलेल्या अनुभवांचे त्यांनी काव्यरुपी लेखन केले असून, ‘खडूचे अभंग’ या नावाने हा संग्रह लवकरच प्रकाशित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला ग्रंथपाल किरण धांडोरे, ग्रंथालयाचे लिपिक राजेंद्र यादव आणि वाचक गटाचे विद्यार्थी उपस्थित होते. उत्पल वाकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जोशी म्हणतात...सातत्याने घरच्या मंडळींनी लेखनाचे कौतुक केल्याने लेखनाला चालना मिळाली.आजुबाजुला सातत्याने घडत असलेल्या प्रसंगांशी एकरुप होऊनभावनिक अनुभूती घेतल्यास उत्तम साहित्यिक बनण्याची संधी.‘शेंबी’ या पहिल्या कादंबरीचे नाव मातोश्रींनी सुचवले.
प्रासंगिक; भावनिक अनुभूतीतून साहित्यनिर्मिती
By admin | Published: November 18, 2014 9:54 PM