रत्नागिरी : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेऊन, सामाजिक सलोखा राखत धार्मिक सण-उत्सव आनंदात आणि शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.जिल्हास्तरीय शांतता व समन्वय समितीची बैठक मंगळवारी (५ सप्टेंबर) पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पोलिस उपअधीक्षक विनित चौधरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, राजश्री मोरे, जीवन देसाई, विजय सूर्यवंशी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या नागरिकांसाठी महामार्गावर मदत केंद्र ठेवण्यात येत आहेत. खासगी बसेस तसेच स्टेशनपासून येणाऱ्या रिक्षाभाड्याबाबत योग्य भाडे आकारणी करण्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभागाने आपल्या स्तरावर बैठक घ्यावी. यामध्ये संबधितांना निमंत्रित करावे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. तहसीलदार स्तरावरही यासंदर्भात सर्वांनी बैठक घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकारण, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरुन घ्यावेत.पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, जादा भाडे आकारले गेल्यास संबंधित रिक्षा चालकावर कारवाई केली जाईल. १४ ठिकाणी महामार्गावर मदत केंद्र उभारण्यात येत आहेत. रेल्वे स्टेशन आणि आवश्यक त्या ठिकाणी योग्य पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. राज्याला दिशा देणारे या जिल्ह्याचा गणेशोत्सव असतो यात सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. यावेळी उपस्थित सदस्यांकडून आलेल्या सूचनांची दखल घेत त्यावर कार्यवाही केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पोलिसांसमवेत विसर्जन मार्ग पायी फिरुन पाहावा. संबधित मार्गावरील खड्डे भरावेत. आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी विजेची व्यवस्था करावी. त्याचबरोबर महामार्गावर क्रेन उपलब्ध ठेवावी.
रत्नागिरीत सामाजिक, सलोखा राखत धार्मिक उत्सव साजरे करा : जिल्हाधिकारी
By शोभना कांबळे | Published: September 05, 2023 5:57 PM