रत्नागिरी : खेड व चिपळूण शहर तसेच चिपळूणच्या ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या अनुषंगाने बाधित मालमत्तांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. ज्यांचे पंचनामे अद्यापही चुकून राहिले असतील, त्यांनी उपविभागीय अधिकारी चिपळूण व खेड, तहसीलदार चिपळूण व खेड, मुख्याधिकारी नगर परिषद, चिपळूण व खेड यांच्याशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती कळवावी. त्यांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्यात येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
ज्या नागरिकांचे पुरामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक गहाळ झाले असेल, अशा नागरिकांनी आपले खाते असलेल्या बँकेशी संपर्क साधून बँक खाते क्रमांक, पॅनकार्ड, आधारकार्ड क्रमांक उपलब्ध करुन द्यावा तसेच त्याच्या छायाप्रती उपलब्ध झाल्यास त्या प्राप्त करुन घेत संबंधित तहसीलदार यांच्याकडे जमा कराव्यात, जेणेकरुन त्यांना तत्काळ मदत करणे सोयीचे होईल तसेच ई-आधारकार्ड मिळवणे सुलभ होईल. सर्व बाधित नागरिकांना उपलब्ध मदत पुरविण्यात आली आहे तथापि कोणतेही नागरिक मदतीपासून वंचित असल्यास खालील क्रमांकावर अथवा याठिकाणी संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदत पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी कळविले आहे.
यासाठी श्रीमती लक्ष्मीबाई माटे सभागृह, कापसाळ, ता. चिपळूण (संजय कांबळे, नायब तहसीलदार ०९४०३५६५२९४, अक्षय कारंडे ८६००६५३५१८), पाटीदार भवन, कापसाळ, ता. चिपळूण (चंदन जाधव ९२७३०१८८६८, मिलिंद नानल ८०८७३३३८६४) यांच्याकडे संपर्क करावा.
तसेच सर्व विमा कंपन्यांनी बाधित नागरिकांच्या विम्याचे दावे संबंधित पंचनामे पूर्ण करुन विम्याची रक्कम तत्काळ अदा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत.