लोकमत न्यूज नेटवर्क
दापोली : कोरोना महामारीच्या काळातही अनेक अडचणींवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देणारे काम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठाने योग्य नियोजन करून २२००.९४ क्विंटल बियाणे खरीप हंगामाकरिता जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महाबीज, कृषी विज्ञान केंद्र, खरेदी-विक्री संघ, कृषी सेवा केंद्र, विविध खासगी, शासकीय संस्थांना विद्यापीठाच्या यंत्रणेमार्फत वेळेआधीच पोहोच केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सर्वच शेतकऱ्यांपर्यंत १५ मेपर्यंत भात बियाणे बांधावर पोहोचले आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकरीही समाधानी आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे पुरविले जाते. कोरोना संकटामुळे त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु, या अडचणींवर तोडगा काढत कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे विभागाचे संचालक अरुण माने यांच्या नेतृत्वाखाली कृषी विद्यापीठाच्या पथकाने शेतकऱ्यांना वेळेआधीच बियाणे उपलब्ध करून दिले आहे.
विद्यापीठाच्या पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील विविध संशोधन केंद्रांवर २०२१च्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला (महाबीज) ११२.६० क्विंटल पैदासकर, २४४.५० क्विंटल पायाभूत व १८४३.८४ क्विंटल सत्यतादर्शक असे एकूण २२००.९४ क्विंटल बियाणे देण्यात आले. त्याद्वारे सुमारे ४०००.८८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणार आहे.
शेतकऱ्यांची बियाण्याची गरज वेळीच ओळखून गेल्या तीन वर्षांपासून ग्राम बीजोत्पादन या मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतावर ही संकल्पना राबविली जात असून, ग्राम बीजोत्पादन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणी उपलब्ध करून देऊन त्यांच्या शेतावरील बियाणे कृषी विद्यापीठ हमीभावापेक्षा अधिक दर देऊन, तेही त्यांच्या घरी जाऊन खरेदी केले जात आहे. त्यामुळेच विद्यापीठाची मागणी पूर्ण होऊ शकली आहे.
.........................
कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्वच जिल्ह्यांत २०२१च्या खरीप हंगामासाठीचे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विद्यापीठाला यश आले आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात योग्य बियाणे न मिळाल्यास शेतकरी मिळेल त्या बियाण्याची पेरणी करतो. त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन दापोली कोकण कृषी विद्यापीठाने काही भाताच्या जाती विकसित केल्या आहेत आणि त्या कोकणच्या हवामानाला अनुकूल असल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे.
- डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
......................
दापोली कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन बियाण्यांची निर्मिती केली होती. निर्मित केलेले बियाणे योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली असून , कोरोना काळात काही निर्बंध असतानासुद्धा शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहोचविण्यात यश आले आहे.
- अरुण माने, संचालक, बियाणे विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली