शोभना कांबळेरत्नागिरी : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे मुलींचा ओढा वाढला असला तरी वाहनांची दुरूस्ती म्हणजे मुलींच्या शारीरिक शक्तीपलिकडील काम, असा समज रूढ असल्याने हाताच्या बोटावर मोजता येतील, अशा मुलींची संख्या या क्षेत्रात दिसते. मात्र, स्वयंपाकघरात जितकं सहजतेनं वावरावं, तितकीच सहजता पुरूषांसाठीही आव्हानात्मक असलेल्या या क्षेत्रात महिला दाखवत आहेत. रत्नागिरीतील कल्याणी शशिकांत शिंदे ही महिलाही गेल्या बारा वर्षांपासून दुचाकी दुरूस्ती लिलया करीत आहे. एवढेच नव्हे तर चार वर्षापासून पतीसोबत स्वकर्तृत्वावर दुचाकी दुरूस्ती गॅरेजही चालवत आहे. जिल्ह्यातील ती पहिली क्रियाशील गॅरेज मालकीण झाली आहे.कल्याणी शिंदे म्हणजे पूर्वाश्रमीच्या कल्याणी सनगरे. आई भाजी विकून तर वडील चणा भट्टीवर काम करून घर चालवत. वडिलांच्या मृत्यूनंतर मामाने कल्याणीचे १२वीपर्यंत शिक्षण केले. त्यानंतर आयटीआयच्या डिझेल मेकॅनिक या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. या अभ्यासक्रमाला इतर विद्यार्थ्यांमध्ये कल्याणी आणि तिची मैत्रिण अशा दोघीच मुली होत्या.२००१मध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या दोघींनी शिकाऊ उमेदवारीसाठी एस. टी. महामंडळाकडे अर्ज केला. मात्र, त्यांना नकार मिळाला. मैत्रीण दुसऱ्या ठिकाणी निघून गेली. कल्याणी हिला आयटीआयचे निदेशक रघुवीर शेलार यांच्या मदतीने एका खासगी चारचाकी शोरूममध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी संधी मिळाली.त्यानंतर नोकरीची गरज असल्याने रत्नागिरीतील एका नामवंत दुचाकी शोरूममध्ये कल्याणीने रिक्त असलेल्या स्टोअरकीपर पदासाठी अर्ज केला. त्या अर्जासोबत तिने आपले आयटीआयचे प्रमाणपत्रही लावले. मालकांनी ते पाहिले आणि त्यांनी चक्क कल्याणीला दुचाकी दुरूस्तीची आॅफरच दिली. त्यावेळी कल्याणीच्या आनंदाला पारावारच राहिला नाही.या शोरूममध्ये तिने दहा वर्षे काम केले. अगदी मनापासून काम करताना तिला खूप काही शिकायला मिळाले. याचठिकाणी शशिकांत शिंदे काम करत होते. याठिकाणी काम करताना त्यांची मनेही जुळली आणि कल्याणी सनगरेची कल्याणी शशिकांत शिंदे झाली. त्यांना सुजल नावाचा मुलगाही आहे. शशिकांत यांनीही कोल्हापुरात प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे आपलंही गॅरेज असावं, हे स्वप्न दोघांचही होतं. अखेर ते त्यांनी अथक परिश्रमाने पूर्णही केलं.चार वर्षापासून ही दोघं रत्नागिरीतील तांबटआळी येथे सिद्धीविनायक आॅटो स्पेअर अँड गॅरेज चालवत आहेत. प्लेजर गाडीच्या दुरूस्तीत हातखंडा असलेल्या कल्याणी आता कुठल्याही दुचाकीची दुरूस्ती सहजगत्या करतात. दिवसाला सुमारे १५ गाड्यांची दुरूस्ती त्यांच्या गॅरेजमध्ये होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध गाड्या दिवसागणिक बाजारात येत आहेत. त्यासाठी आपल्यालाही त्याचे ज्ञान अवगत असायला हवे, याबाबत कल्याणी या आग्रही असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे.वेगळं क्षेत्र निवडल्याचा आनंद..कल्याणी शिंदे यांची आई - वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्धार केला होता. योगायोगाने जरी डिझेल मेकॅनिक बनण्याची संधी मिळाली असली तरी त्यांना आपण हे वेगळं क्षेत्र निवडल्याचे समाधान वेगळाच आनंद देऊन जाते.पहिल्याच बॅचच्या विद्यार्थिनी...कल्याणी शिंदे यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र, त्यांच्या मैत्रिणीने अभ्यासक्रम निवडीच्या ठिकाणी पहिल्याच क्रमांकावर डिझेल मेकॅनिक अभ्यासक्रम लिहिल्यामुळे त्यांना हा अभ्यासक्रम स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाच्या या दोन पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी ठरल्या आणि दोघींनीही हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्णही केला.महिला ग्राहकांकरिता वेगळं गॅरेज..मुली आपल्या दुचाकी दुरूस्तीसाठी घेऊन जातात, त्यावेळी बहुतांशी मेकॅनिक पुरूष असल्याने त्या मोकळेपणाने वावरू शकत नाहीत. त्यामुळे महिला स्वारांसाठी स्वतंत्र गॅरेज उभारण्याची कल्याणी शिंदे यांची तीव्र इच्छा आहे. रॅम्प बांधण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.आता स्वत:च प्रशिक्षक...कल्याणी यांना स्वत:ला पहिला नकार मिळाला असला तरी त्यांनी आता इतर शिकाऊ मुलांनाही आपल्या गॅरेजमध्ये प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत दहावी पास-नापास मुला - मुलींसाठी घेण्यात येणाऱ्या तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमांच्या सुमारे ९० विद्यार्थ्यांना कल्याणी शिंदे यांनी आपल्या गॅरेजमध्ये प्रशिक्षण दिले आहे. सध्याही त्यांच्याकडे दोन मुले शिकत आहेत. त्यांच्या गॅरेजमध्ये निपुण झालेल्या एका मुलाला मुंबईतील एका मोठ्या शोरूममध्ये नुकतीच नोकरी लागली आहे.मुलींना अजूनही नकारच..व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांकडे मुलींचा ओढा वाढला आहे. मात्र, अजूनही त्यांची शारीरिक क्षमता कमी समजून त्यांना नाकारले जाते. कल्याणी शिंदे आणि त्यांची मैत्रिण यांनाही एस. टी. महामंडळात शिकाऊ उमेदवारीसाठी नकार मिळाला होता. दोघींनी वादही घातला होता. मात्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक रघुवीर शेलार यांच्या सहकार्यामुळे त्यांना खासगी बड्या गॅरेजमध्ये वर्षभरासाठी चारचाकी दुरूस्त करण्याची संधी मिळाली.प्रशिक्षणाच्या ठिकाणीही एकमेवडिझेल मेकॅनिक असणाऱ्या कल्याणी शिंदे नागपूर, पुणे येथे दुचाकी गाड्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी गेल्या असता, तिथेही त्या एकमेव महिला मेकॅनिक ठरल्या. त्यामुळे त्या तिथेही कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय बनल्या होत्या. अनेक महिलांनी त्यांच्या या कामगिरीचे कौतुकही केले.
रांधणाऱ्या हातात किमया दुचाकी दुरूस्तीची, रत्नागिरीतील तिनं निवडलं वेगळं क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:02 PM
रत्नागिरीतील कल्याणी शशिकांत शिंदे ही महिलाही गेल्या बारा वर्षांपासून दुचाकी दुरूस्ती लिलया करीत आहे. एवढेच नव्हे तर चार वर्षापासून पतीसोबत स्वकर्तृत्वावर दुचाकी दुरूस्ती गॅरेजही चालवत आहे. जिल्ह्यातील ती पहिली क्रियाशील गॅरेज मालकीण झाली आहे.
ठळक मुद्देरांधणाऱ्या हातात किमया दुचाकी दुरूस्तीची, तिनं निवडलं वेगळं क्षेत्रदुरुस्तीपासून सुरु झालेला व्यवसाय स्वमालकीच्या गॅरेजपर्यंत पोहोचला