राजापूर : गतवर्षाप्रमाणेच ओणी अणुस्कुरा मार्गावर बारीक खडी आणून टाकण्यात आली आहे. पण अनेक दिवस उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने उलट-सुलट प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत.मागील वर्षीही अशाच प्रकारची खडी मार्गावर काही ठिकाणी आणून टाकण्यात आली होती. परंतु, १५ मे पासून डांबरीकरणाची कामे थांबतात. हा अनेक वर्षापासूनचा पायंडा असल्याने नंतर पावसाला सुरुवात होताच ती खडी तेथून हटवण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीही पहावयास मिळत आहे. मागील दोन आठवड्यापासून अधिक काळ असे खडीचे ढीग ओणी, पाचल मार्गावर टाकण्यात आले आहेत. आता शासनाच्या धोरणानुसार १५ मे जवळ असल्याने पुढच्या काही दिवसात ही खडी पसरुन खडीकरणाचे काम खरोखरच मार्गी लागणार आहे का? की गतवर्षीप्रमाणे ती खडी पुन्हा तेथून हटवली जाणार आहे? असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान चालू उन्हाळ्यात याच मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. पण त्या झालेल्या कामाचा दर्जा लक्षात घेता आगामी पावसाळ्यात हे खड्डे पुन्हा पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास गतवर्षाप्रमाणे तालुक्यातील पूर्व परिसरवासीयांना या खड्ड्यांतून प्रवास करण्याचे नशिबी येणार आहे. या संपूर्ण मार्गाचेच डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित बांधकाम विभागाने तसे न करता केवळ मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचा फार्स केला व संपूर्ण मार्गाचे डांबरीकरण करण्याचे काम लटकवून ठेवले आहे. त्याचा फटका हा आगामी पावसाळ्यात या मार्गाला बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात या परिसरातील ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यावरुनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे आतातरी डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी)सवाल : गेल्यावर्षीची पुनरावृत्ती?गेल्यावर्षीही असाच प्रकार घडला होता. बारीक खडी आणून ठेवण्यात आली. मात्र त्यानंतर त्या खडीचे काय झाले? कुणासच ठाऊक नाही. त्याचप्रमाणे यंदाही बारीक खडी आणून ठेवण्यात आली आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे हे डांबरीकरणाचे काम कधी होणार? असा सवाल होत आहे.घाटाची दुरवस्थाअणुस्कुरा घाटाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांबरोबरच खडीही वर आल्याने वाहन चालविणे जिकरीचे बनले आहे.
ओणी अणुस्कुरा मार्ग दुरुस्ती काम थांबलेलेच
By admin | Published: May 15, 2016 12:01 AM