रत्नागिरी : नवीन मासेमारी कायद्यातील जाचक अटीमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात आली आहे. शासनाने या अटी रद्द कराव्यात, केवळ पर्ससीन मच्छिमारांना लक्ष करून कारवाई करू नये, अन्य मासेमारीचाही अभ्यास करावा या मागणीसाठी गुरुवारी रत्नागिरीतील पर्ससीनधारक मच्छिमारांनी रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी मच्छिमारांनी दिलेल्या घाेषणांनी परिसर दणाणून गेला हाेता.
समुद्रातील मत्स्य साठ्यावर होणार्या प्रतिकूल परिणामाला प्रत्येकवेळी पर्ससीन नेट मासेमारीलाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे पर्ससीन मासेमारीवर जाचक निर्बंध टाकण्यात आले आहेत. इतर मासेमारी जाळ्यांनी होणार्या मासेमारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मत्स्यसाठा जतन करण्याबाबत नव्याने होणार्या अभ्यासात ट्रॉलनेट, डोलनेट, गिलनेट, हूक अॅन्ड लॅन्ड या मासेमारीचाही अभ्यास झाला पाहिजे, या मागणीसाठी पर्ससीन नेट मच्छिमार, मालक आणि या मासेमारीवर अवलंबून असणारे पूरक व्यावसायिक या मोर्चात सहभागी झाले होते.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथून सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये हजारो मच्छीमार बांधव सहभागी झाले होते. मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभा घेऊन जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या सभेनंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.