खेड : तौक्ते चक्रीवादळामध्ये तुटलेली विद्युत वाहिनी अंगावर पडून झालेल्या बोरज येथील दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी खेड तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले. गार्डिंग वायर नसल्याने ही दुर्घटना घडली आणि त्याला महावितरणचे अधिकारीच जबाबदार आहेत, हे लक्षात घेऊन पोलिसांनी तपास करावा आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी सूचना बैठकीला उपस्थित असलेल्या पोलीस उपअधीक्षक शशिकांत काशीद यांना केली.
तौक्ते चक्रीवादळामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव बुधवारी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. कोरेगाव, शिव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांनी भेट दिली आणि लसीकरण मोहिमेबरोबरच तिथल्या समस्याही समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली.
ही बैठक सकाळी ११ वाजता होती. आमदार जाधव नेहमीच कोणत्याही कार्यक्रम वा बैठकीला दिलेली वेळ पाळतात. ते स्वतः वेळेवर येतात, याची खात्री असल्यामुळे अनेक अधिकारी ते येण्यापूर्वी हजर असतात. मात्र ही बैठक वेळेत सुरू झाल्यानंतरही अनेक खात्यांचे अधिकारी उपस्थित नव्हते. बैठक सुरू झाल्यानंतर एक-एक अधिकारी आरामशीर येत होते. काही अधिकारी अचानक रजेवर गेले होते. हे पाहून आमदार जाधव यांचा पारा चढला. त्यांनी एकेका अधिकाऱ्याची हजेरी घ्यायला सुरुवात केली. काही अधिकाऱ्यांनी नुकसानाची माहितीही आणली नव्हती. ज्यांनी आणली होती, त्यात अनेक चुका होत्या. त्यामुळे ते अधिकच संतापले आणि हा बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिली.
चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा, काजू या झाडांवरील फळ गळती झाली आहे. या भागात उन्हाळी भात पीक घेतले जाते. ते कापणीला आले होते. वादळ व पावसामुळे ते पूर्णपणे हातचे गेले आहे. चक्रीवादळामुळे अनेक झाडे पिळवटतात आणि वाकतात. ही झाडे जिवंत दिसतात, परंतु दोन-तीन महिन्यांतच ती मरतात. अशा झाडांचाही पंचनामा करावा.
गुरे दगावल्यास ३५ हजारांपर्यंतची भरपाई शासनाकडून मिळते. या नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
सन २०१४ ते २०१९ या काळात जिल्ह्यात एकही नळपाणी योजना मंजूर झालेली नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्ह्यात गुहागर मतदारसंघात वेळणेश्वर (ता. गुहागर) व दयाळ (ता. खेड) येथे पाणीयोजना मंजूर झाल्या. त्यातील वेळणेश्वरची योजना पूर्ण झाली. परंतु, दयाळच्या योजनेच्या कामाचे आदेशच अजून काढण्यात आलेले नाहीत, हे समोर आल्यावर गुहागर मतदारसंघात येणाऱ्या गावांकडे दुर्लक्ष कराल तर गाठ माझ्याशी आहे, असाही इशारा त्यांनी दिला.
बैठकीला प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती सुनील मोरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश आंब्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे, संजय गोलटकर, विजय राक्षे, आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.