देवरुख : जिल्ह्यात अनेक धरणांची कामे अद्याप अपूर्णावस्थेतच आहेत. या धरणांमुळे किती क्षेत्र ओलिताखाली आले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. या धरणांचे काम अद्याप का पूर्ण होऊ शकले नाही, असे जाब अधिकाऱ्यांना विचारीत धरणाच्या कामांची चौकशी करुन त्वरित अहवाल सादर करा, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी देवरुख येथे दिली.संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आयोजित जनता दरबारात पंचायत समिती, देवरुखच्या सभागृहात एका प्रश्नाला उत्तर देताना वायकर बोलत होते. दिलीप सावंत यांनी विचारलेल्या जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या समस्यांबाबतच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी अहवाल सादर करुन पुढील जनता दरबारापर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, असे आदेश दिले.यावेळी रस्त्यांबाबतचे प्रश्न समोर आले. तोडगा काढून काही रस्त्यांसाठी नाबार्डकडून, तर काही रस्ते जिल्हा नियोजनामधून घेण्यात येतील, असे वायकर यांनी स्पष्ट केले. नादुरुस्त साकवासाठी ठराव मागण्यात आले. याबरोबरच बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत जातीने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सुनील भोसले यांनी मांडलेल्या प्रश्नावर २२/२३ सप्टेंबर रोजी फुणगूसमध्ये झालेल्या जादूटोण्याबाबतची चौकशी योग्य पद्धतीने करण्याचे आदेश संगमेश्वरच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले.यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, पंचायत समिती, देवरुखच्या सभापती मनीषा गुरव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री गायकवाड, तहसीलदार वैशाली माने उपस्थित होत्या.या जनता दरबारामध्ये सर्वाधिक बांधकाम विभाग आणि पाणलोट विकास योजना आणि घरकूल योजना यावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान सोनवडेतील अंध असणाऱ्या अजित घाणेकर या तरुणाला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी २५ हजार रुपयांची मदत तत्काळ दिली. जनता दरबारात तालुक्यातून आलेल्या एकूण ४१ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सर्वच विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील विषय आला होता. मात्र, या विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीसा द्या, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.
अपूर्ण धरणांचा त्वरित अहवाल द्या
By admin | Published: February 25, 2015 9:52 PM