पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी सूरकरवाडी हॉल ते खेडेकर यांचे घर या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्या कामाकडे तातडीने लक्ष द्यावे, असे निवेदन बांधकाम विभागाला गावखडी ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे दिले आहे. निकृष्ट कामाबाबत ठेकेदाराकडे विचारणा करून अहवाल देण्यात यावा, असेही ग्रामपंचायतीने म्हटले आहे.
गेली कित्येक वर्ष या रस्त्यावर सतत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था खराब झाली होती. प्रत्येकवेळी या रस्त्यासंदर्भात फक्त आश्वासने दिली जात होती. प्रत्यक्षात मात्र निधी उपलब्ध होत नव्हता. अखेर मेमध्ये या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता १५ लाखांचा निधी देण्यात आला होता. त्यादृष्टीने रस्त्याच्या नूतनीकरण कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, संबंधित ठेकेदाराने व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे रस्त्याचा दर्जा राखला गेला नाही. त्यासंदर्भात संबंधित ठेकेदार व बांधकाम अभियंता यांना समज देण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
यासंदर्भात गावखडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत चर्चा करून ठराव करण्यात आला. संबंधित बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असून, त्यात संबंधित रस्त्याची झालेली अवस्था पाहून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत ठेकेदाराला जाब विचारून रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत अहवाल देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.