राजापूर : तालुक्यात उपळे-तळेखाजन-प्रिंदावण येथे रस्त्याच्या बाजूला फासकीत अडकलेल्या बिबट्याला फासकीतून सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना गुरूवारी (१५ सप्टेंबर) सकाळी घडली. हा बिबट्या मादी जातीचा असून, तिचे वय एक ते दीड वर्षे असल्याचे वनविभागाने सांगितले.मौजे उपळे - तळेखाजन - प्रिंदावण येथे रस्त्याच्या डाव्या बाजुला फासकीत एक बिबट्या अडकल्याची माहिती उपळेचे रहिवाशी कमलाकर कदम यांनी गुरूवारी सकाळी राजापूर वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्यालगत फासकीत मादी जातीचा बिबट्या अडकल्याचे दिसले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्याला सुखरुपपणे नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.ही कामगिरी रत्नागिरीच्या परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, लांजाचे दिलीप आरेकर, पालीचे न्हानू गावडे, राजापूरचे वनरक्षक विक्रम कुंभार, लांजाचे सूरज तेली, कोर्लेच्या श्रावणी पवार, तसेच रेस्क्यू टिमचे दीपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, नीलेश म्हादये, विजय म्हादये यांनी बजावली. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले.
राजापुरात फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका
By मनोज मुळ्ये | Updated: September 15, 2023 18:31 IST