रत्नागिरी : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती महत्त्वाची आहे. यासाठी त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी केले. मंडळाच्या कार्यालयात आयोजित निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
मंडळातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले होते. आठवी ते दहावी वयोगटात मधुमती मयेकर, तर खुल्या गटात प्रथम आलेले रामचंद्र आनंदा चव्हाण पाटील यांना मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार आणि कार्यवाह प्रभाकर सनगरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक प्रभाकर सनगरे यांनी केले. रामचंद्र चव्हाण - पाटील, श्रावणी पारकर, कल्पेश पारधी, अविनाश काळे आदी स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन व आभार प्रभाकर सनगरे यांनी केले. कोविड नियमावलीचे पालन करून बक्षीस वितरण पार पडले. कार्यक्रमाच्या नियोजनात गौरव मुळ्ये यांनी सहकार्य केले.