- शिवाजी गोरे
दापोली- कोकणातील लाल मातीतसुद्धा उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, हा प्रयोग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या शात्रज्ञानी यशस्वी केला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख असून, या थंड वातावरणात आपण आजपर्यंत शेकडो एकरची स्ट्रॉबेरी शेती होताना पाहिली आहे. महाबळेश्वरच्याच धर्तीवर कोकणातील थंड हवा व आल्हाददायक वातावरणात उत्कृष्ट स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, असा निष्कर्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शात्रज्ञांनी काढला आहे. त्यानंतर दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे. वाकवली येथील प्रक्षेत्रात कॅमारोजा, एस. ए., विंटर टोन या तीन जातींची लागवड करण्यात आली आहे. तुलनात्मकदृष्ट्या कोणत्या जातीचे कोकणात चांगले उत्पन्न येऊ शकते, यावरही अभ्यास सुरू आहे.
कोकणात केवळ भातपीक घेतले जाते; मात्र भातपीक घेऊन झाल्यावर शेती ओसाड पडलेली असते. या शेतीत दुबार पीक म्हणून स्ट्रॉबेरी शेती पर्याय ठरु शकते. कोकणातील स्ट्रॉबेरी पिकाला हेक्टरी १० ते १५ टन उत्पन्न मिळू शकते. यातून मिळणारे २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते, असा दावा कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाने केलेला स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तरंच कृषी विद्यापीठाने केलेला स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयत्न सत्यात उतरेल.
महाबळेश्वर येथून रोपे खरेदी करून नोव्हेंबर महिन्यात प्रायोगिक तत्वावर दहा गुंठे जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. यातून १ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ८० हजार खर्च वगळता १ लाख रुपये निव्वळ नफा या लागवडीतून मिळणार आहे. स्ट्रॉबेरीचे हेक्टरी १८ लाख रुपये उत्पन्न मिळते, त्यापैकी ८ लाख खर्च गेला, तरीसुद्धा १० लाखांचा नफा मिळू शकतो. केवळ ३ महिन्यात कोणत्याही पिकापासून शेतकऱ्याला १० लाख रुपये एवढा नफा मिळत नाही. मात्र, स्ट्रॉबेरी पीक नाजूक असल्याने थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. स्ट्रॉबेरी शेतीतून अल्प कालावधीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळणार आहे. भातपिकानंतर रब्बी हंगामात स्ट्रॉबेरी शेती हा चांगला पर्याय ठरु शकतो. मात्र, स्ट्रॉबेरी हे नाजूक पीक असल्याने पिकाची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे. या पिकाचा हंगाम कालावधी ४० दिवस असू शकतो. स्ट्रॉबेरी पीक ४० ते ५० दिवसात तोड योग्य होऊ शकते. परंतु, जानेवारीनंतर कोकणातील उष्णतेत वाढ होऊ लागते. त्यामुळे लवकर लागवड करून लवकर पीक कसे घेता येईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे. स्ट्रॉबेरीची कोणती जात कोकणातील वातावरणात अधिक चांगली येऊ शकते, कोणत्या जातीपासून चांगले उत्पन्न मिळू शकते, याचा तुलनात्मक अभ्यास सध्या सुरु आहे.
अधिक पिके घेण्याचा प्रयत्नदापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, विस्तार शिक्षण संचालक, संशोधन संचालक यांचे मार्गदर्शनाखाली स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे. वाकवली संशोधन केंद्र्रात विविध प्रकारची भाजीपाला पिके, कंदपिके, कलमे रोपे, नारळ, आंबा, काजू पिकातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावर्षीपेक्षा अधिक पिके पुढच्यावर्षी घेतली जातील.डॉ दिलीप महाले, विभागप्रमुख, वाकवली मध्यवर्ती संशोधन केंद्र,
चांगली मागणीदापोली कोकण कृषी विद्यापीठाची स्ट्रॉबेरी बाजारामध्ये विक्रीला आली असून, दापोलीच्या स्ट्रॉबेरीला पर्यटक व स्थानिक ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेत या स्टॉबेरीला चांगली मागणी आहे.