रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मुंबईतून २२०० जादा गाड्या मुंबईतून येणार आहेत. उत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांना परतीसाठी रत्नागिरी विभागातून १५५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून २७९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून बोरीवली, मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, विरार, भांडूप, भाईंदर, पुणे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगच्या बसेसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानक तसेच खासगी आरक्षण केंद्राकडे आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मोबाईल अॅपव्दारे प्रवाशांना ऑनलाईन आरक्षण करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.दि.१९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने दि.१५ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे आगमन होणार आहे. दि.२३ पासून परतीसाठी एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. परतीसाठी २७९ गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. दापोली आगारातून २००, खेड १५०, चिपळूण २३०, गुहागर २६०, देवरूख १८०, रत्नागिरी १५०, लांजा १३०, राजापूर १७०, मंडणगड आगारातून ८० मिळून एकूण १५५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
Ganeshotsav 2023: एसटी गाड्यांचे आरक्षण झालं फुल्ल, रत्नागिरी विभागातून परतीसाठी १५५० जादा गाड्यांचे नियोजन
By मेहरून नाकाडे | Published: August 01, 2023 4:57 PM