ग्रुप ग्रामपंचायतीची मागणी, सर्व यंत्रणांना निवेदन
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यातील वेरळ - जांबुर्डे गावातील रहिवाशांना कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून शासनाकडून पुरविण्यात येणारी लस अत्यल्प प्रमाणात देण्यात येत आहे. त्यामुळे पुरेशी लस मिळावी, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत, वेरळ जांबुर्डेतर्फे प्रशासन व संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वेरळ - जांबुर्डेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेरळ - जांबुर्डे गावासाठी कोरोना लसीकरण हे प्राथमिक आरोग्य केंद्र, तिसंगी येथे होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत, वेरळ - जांबुर्डे क्षेत्रात ३,६२८ लोकसंख्या असून, प्राथमिक आरोग्य केंद्र, तिसंगी हे वेरळ गावापासून १२ किलाेमीटर अंतरावर आहे. गावात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. परंतु, वेरळ व जांबुर्डे गावांसाठी देण्यात येणारी लसींची संख्या तुटपुंजी आहे. दि. १४ जूनपर्यंत तिसंगी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वेरळ गावाला केवळ ५० लसींचे वितरण करण्यात आले आहे. वेरळ गाव हे खेड शहरालगत असून, गावातून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग, खेड रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्याची संख्या अधिक आहे. तालुक्यातील शिरगाव या दुर्गम भागातही २०० लसींचे वितरण झाले. मात्र, वेरळ-जांबुर्डेची लोकसंख्या सुमारे चार हजार असतानाही केवळ ५० लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर लसीचे किमान ४०० डोस उपलब्ध करावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.