रत्नागिरी : शहरात कोरोना लसीचे ऑफलाइन डोस देण्याचे अधिकार रत्नागिरी नगरपरिषदेकडे ठेवून केंद्रावर लस देताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या. ऑफलाइन लस देताना कोणत्याही एका संस्थेला अधिकार देऊ नयेत, अशी मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली. या मागणीला सर्वांना पाठिंबा देत ठराव मंजूर करण्यात आला.
पुन्हा चिखल, खड्डे
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात पुन्हा चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. हे खड्डे तातडीने भरण्याची मागणी होत आहे. लांजा शहरातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा अर्धवट कामाचा फटका नागरिक व वाहन चालकांना होत आहे.
शासनाचा निषेध
राजापूर : वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीला शासनाचा विरोध, वारकऱ्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेचा तालुक्यातील विश्व हिंदू परिषद प्रखंड राजापूर व वारकरी समाज संप्रदायातर्फे निषेध करण्यात आला. त्याबाबतचे निवेदन वारकरी संप्रदायासह विहिंपतर्फे तहसीलदार प्रतिभा वराळे यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची गांधीगिरी
रत्नागिरी: राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसतर्फे ‘खड्डे चुकवा बक्षीस मिळवा’ हे अनोखे आंदोलन शहरातील राम नाका ते राधाकृष्ण नाका बाजारपेठ येथे करण्यात आले. खड्डे चुकविता न आल्याने, पुन्हा या नगरपरिषदेतील भ्रष्ट सत्ताधार्यांना निवडून न देण्याचे आवाहनही केले. वाहनधारक रत्नागिरीकर नागरिकांना त्यांच्या सहनशीलतेबद्दल गुलाबपुष्प देण्यात आली.
अँटिजन चाचणीची मोहीम सुरू
खेड : नगर प्रशासनाने पुन्हा रविवारपासून अँटिजन चाचणीची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील ठिकठिकणाच्या चौकांसह मोक्याच्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या मोबाइल व्हॅनद्वारे तालुका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे.
शिवसंपर्क अभियान बैठक
खेड : तालुक्यातील तळे येथे तालुकाप्रमुख विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसंपर्क अभियान बैठक पार पडली. कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला ठेऊन नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत संघटना बळकटीसाठी झोकून द्यावे, असे आवाहन जाधव यांनी केले.
बसफेरीच्या मार्गात बदल
मंडणगड : म्हाप्रळ-आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने मंडणगड-तिडे-तळेघर-नालासोपारा बसच्या मार्गात सोमवारपासून बदल करण्यात आला आहे. मंडणगड येथून दुपारी १२.१५ वाजता सुटणारी नालासोपारा मार्गावरील गाडी रात्री ८ वाजता नालासोपारा येथे पोहोचणार आहे. नालासोपाऱ्यातून गाडीचा परतीचा प्रवास पहाटे ६.३० वाजता सुरू होणार आहे. म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांचे २४ किलोमीटर लांबीचा अतिरिक्त प्रवास तिकिटांचा अतिरिक्त भार कमी होणार आहे.
कथा-काव्यलेखन स्पर्धेत व्दितीय
खेड: पुणे येथील महाराष्ट साहित्य परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तर कथा व काव्य लेखन स्पर्धेत खेडच्या रूपाली पाटील यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. काव्य लेखन स्पर्धेसाठी कोरोना काळ व कथा लेखनासाठी कोरोना काळातील मानवी मनाच्या अवस्था हे विषय होते.
खड्ड्यात वृक्षारोपण
चिपळूण: चिपळूण-कराड मार्गावरील बहादूरशेख नाका येथे गेल्या काही दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे तो खड्डा पाण्याने भरून गेल्याने अपघात वाढत असतानाही, तो भरला न गेल्याने अखेर सोमवारी काही संतप्त वाहन चालक व नागरिकांनी या खड्ड्यात वृक्षारोपण करत आपला संताप प्रगट केला.
लोकअदालत १ राेजी
रत्नागिरी: जिल्हा विधिसेवा प्राधिकरणातर्फे १ ऑगस्ट, २०२१ रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे लोकअदालत होणार आहे. राष्ट्रीय लोकअदालत सकाळी १०.३० वाजता भरविण्यात येणार आहे. दोन्ही पक्षकारांकडे व्हाॅट्सॲप व ई-मेल सेवा उपलब्ध असेल, तरच त्यांना ऑनलाइन सहभागी होता येणार आहे.