देवरुख : नगरपंचायत हद्दीतील खालची आळी भागात सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या सारणीचा मार्ग बंद झाल्याने हे सर्व पाणी रस्त्यातच साठत होते. त्यामुळे नागरिकांचा वर्दळीचा मार्ग बंद होत होता. यावर नगरपंचायतीकडेही काही तोडगा नव्हता. ही बाब आमदार शेखर निकम यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ या भागाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत त्यांनी ताेडगा काढल्यानंतर पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
सारणीचा मार्ग ही बाब न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने नगरपंचायतीला दुसरा मार्ग शोधणे कमप्राप्त होते. तरीही नागरिकांच्या या प्रश्नाकडे नगरपंचायतीने गांभिर्याने पाहिले नाही. येथील नागरिकांच्या विहिरीत हे सांडपाणी जाणून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. येथील नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले हाेते. त्यानंतरही त्यावर ताेडगा निघालेला नाही. आमदार शेखर निकम यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यांनी विनायक आमडेकर यांना पाणी वाहून जाण्यासाठी जागा देण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांनी जागा माेकळी करून दिली.
आमडेकरांनी सामाजिक बांधीलकी जपून ठराविक कालावधीसाठी जागा देण्याचे मान्य केले. आमदारांच्या विनंतीवरून आमडेकरांनी जागा उपलब्ध करून दिल्यावर नगरपंचायतीने गटार खोदून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला. यामुळे रस्त्यावर येणारे पाणी बंद झाले आहे.