रत्नागिरी : कोरोना काळात प्रशासनाच्या मदतीला धावून आलेल्या २८ विविध सामाजिक संस्थांचा फोरम असलेल्या ‘हेल्पिंग हॅन्ड्स’ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या मूर्ती सन्मान संकल्पनेला गणेशभक्तांकडून प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी रत्नागिरीतील ३७ गणेशभक्तांनी आपल्या बाप्पाच्या मूर्तीला शहरातील माळनाका येथील कृत्रिम तलावात विसर्जन करून सन्मान दिला.
रत्नागिरीत दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने शहरातील लक्ष्मी चौक उद्यान, माळनाका उद्यान, नूतन नगर उद्यान, विश्वनगर उद्यान या चार ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणी केली होती. गणेशोत्सव सुरू होताच कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी हेल्पिंग हॅन्ड्स तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून सोशल मीडियावरून सातत्याने आवाहन करण्यात येत होते. त्या आवाहनाला गणेशभक्तांनी प्रतिसाद देत ११ मूर्तींचे विसर्जन केले.
पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठीही हेल्पिंग हॅन्ड्सच्या माध्यमातून या कृत्रिम तलावांचा वापर करून पर्यावरणाला मदत करण्याचे सातत्याने आवाहन होत होते. त्यालाही उत्तम प्रतिसाद देत ३७ जणांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला हातभार लावला. एवढेच नव्हे, तर ही संकल्पना खूप चांगली असून निर्माल्य वेगळे जमा करायची संकल्पना मनापासून आवडली असल्याचे सांगितले. या भक्तांना हेल्पिंग हॅन्ड्सच्यावतीने सन्मानपत्र देण्यात आले. त्यामुळे आनंदित झालेल्या या गणेशभक्तांनी पुढीलवर्षीही आपण नक्कीच अशा प्रकारे मूर्तीला सन्मान देऊ, असे सांगितले. या उपक्रमाला पोलीस विभागाचेही उत्तम सहकार्य मिळाले.
प्रशासनामार्फत जनजागृतीसाठी लोकांच्या घरोघरी हा संदेश गेल्यास अनंतचतुर्दशीला पर्यावरणपूरक विसर्जनासाठी लोकसहभाग अधिक वाढेल. तसेच कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत, तिथे छोटासा मंडप, खुर्च्या, टेबल, आकर्षक निर्माल्य कलश ठेवल्यास चांगला परिणाम होईल, अशा प्रतिक्रिया हेल्पिंग हॅन्ड्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
हेल्पिंग हॅन्ड्स या संकल्पनेतून एकावेळी अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांसाठी अनेक हातांची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी हेल्पिंग हॅन्ड्सचे बळ वाढवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मूर्ती सन्मान संकल्पनेला प्रतिसाद दिलेले भक्त...
अरुण दुर्वे, महादेव तुरंबेकर, सूर्यकांत गावडे, मिलिंद तगारे, महेश्वरी कदम, ज्ञानेश जोशी, अमोल डोंगरे, गुरुप्रसाद जोशी, महेश कामेरकर, विश्वास भोळे, मदन बोरकर, वैभव साळवी, गणेश कांबळी, अमर भागवत, आनंद देवरुखकर, रामकृष्ण कीर, प्रवीण कोळवणकर, सुरेश चव्हाण, सचिन सागवेकर, लहू तोडणकर, संतोष पावसकर, निशिकांत जोशी, अर्जुन यादव.
.......
फोटो मजकूर
रत्नागिरी शहरातील माळनाका येथील कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पुढे आलेल्या गणेशभक्तांना हेल्पिंग हॅन्ड्सच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले.