खेड : येथील सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कासारे, सचिव सतीश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खेडच्या पोलीस निरीक्षक दिशा जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
साहित्य वाटप
लांजा : येथील कुणबी समाजोन्नती संघातर्फे साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर आदी साहित्य भेट दिले. लांजा शाखाध्यक्ष संतोष माटल, सचिव संदीप पड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पंचनाम्याची मागणी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात तौक्ते चक्रीवादळामुळे विविध गावांना फटका बसला आहे. तालुक्याच्या विविध भागात अजूनही पंचनामे सुरु आहेत. पंचनामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी सर्वस्तरावरुन होत असून लवकरात लवकर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे.
एस.टी. फेऱ्या
राजापूर : आगारातून नालासोपारा, अर्नाळा, चिपळूण, राजापूर या दोन मार्गावर फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करुन एअर सस्पेन्शन असलेली विठाई नवीन बस सोडण्यात येत आहे. शनिवारपासून नालासोपारा, अर्नाळा व चिपळूण मार्गावर धावणार आहे.
आरोग्य केंद्र सुरु
खेड : तालुक्यातील जामगे प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी सुरु होणार आहे. चाकाळे, मुर्डे, आंबये, शिवतर, तिसे, जामगे, घेरापालगड गावांसाठी आवश्यक असणारे हे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झाले आहे. लवकरच ते लोकार्पण केले जाणार आहे.
ससाळे परिसरात अंधार
राजापूर : तालुक्यातील ससाळे व पांगरेमध्ये चक्रीवादळामुळे वीजखांब कोसळल्याने अद्याप वीजपुरवठा खंडित आहे. गेले सहा दिवस गाव अंधारात असून केळवली परिसरातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला असला तरी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
सिद्धी शिंदेचे यश
चिपळूण : जानेवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सिद्धी संजय शिंदे हिने ९९.५७ टक्के गुण मिळवत एसपीएसारख्या नामांकित विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत पात्र होण्याचा बहुमान मिळविला आहे.
वार्षिकोत्सव ऑनलाईन
गुहागर : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरचा वार्षिकोत्सव ‘सप्तक २०२१’ ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी गुगल मीट, गुगल फॉर्म, झुम मीट, व्हॉटस्अॅप ग्रुप, डिस्कॉट अॅप या तंत्रज्ञानाचा वापर करुन सात दिवस ऑनलाईन कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या.
ऑनलाईन कर्ज योजना
रत्नागिरी : लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार मंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या कृषी मालाच्या पावतीवर तारण कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी राज्य वखार मंडळ व राज्य सहकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन तारण योजना सुरु करण्यात आली आहे.
सुधारित वेतनश्रेणी
रत्नागिरी : केंंद्र सरकारने केेंद्रीय विद्यापीठे, महाविद्यालये, संस्था यांना सातवा वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणी लागू केल्या आहेत. वाढीव वेतनाच्या फरकातील भार केंद्र व राज्य सरकार सोसणार आहे. केंद्राकडून राज्याला ५० टक्के रक्कम देण्यात आली आहे. त्यानंतर थकबाकीची रक्कम अदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.