चिपळूण : शहीद दिनानिमित्त श्री हॉस्पिटल, लब्बैक कमिटी मुल्ला मोहल्ला, मुंबईतील संवेदना व सायन रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने सावर्डे येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुमारे ३३ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, सदस्य समिया मोडक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबू चव्हाण यांच्या हस्ते झाले.
खेडमध्ये जिओची सेवा कोलमडलेलीच
खेड : शहरासह ग्रामीण भागात जिओ कंपनीच्या मोबाइल सेवेत गेल्या चार दिवसांपासून उडालेला बोजवारा अजूनही कायम आहे. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात खासगी कंपनीच्या मोबाइल सेवेत व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश ग्राहकांनी जिओ सेवेला पसंती दिली होती. मात्र जिओ सेवा गेल्या चार दिवसांपासून पुरती कोलमडलेली आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदीप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पार पडले. रेल्वेस्थानकप्रमुख नीलेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासंबंधी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे एक निश्चित ध्येय ठरवून वाटचाल केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रिया बावकर यांनी केले.
चंद्रनगर शाळेत जलदिन
दापोली : तालुक्यातील चंद्रनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक जलदिन नुकताच उत्साहात पार पडला. शिक्षकांच्या कल्पनेतून नियोजन केलेल्या या कार्यक्रमात विविध विषयांचे सादरीकरण करण्यात आले. श्रावणी मुळे हिने शपथपत्र वदवून घेतले. धीरज शिगवण याने पाण्याच्या वापरासंदर्भात घोषवाक्य सादर केली. लक्ष्मी शर्मा हिने पाण्याची गोष्ट सांगितली. वेदांत पवारने स्वरचित कवितेचे वाचन केले. सेजल कांबळेने पाण्याला कृतज्ञतापूर्वक लिहिलेल्या पत्राचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर या विषयावर आयोजित चित्रकला उपक्रमात सहभाग घेतला.