चिपळूण : शहरातील दिव्यांग व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महसूल विभाग, नगरपरिषद आरोग्य विभाग आणि तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पोलीस वसाहत हॉलमध्ये लसीकरण मोहीम राबविली.
शहरातील तीन लसीकरण केंद्र व ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांतर्गत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तालुक्यातील अनेकांना अद्याप पहिला डोसही मिळालेला नाही. त्यामध्ये बहुसंख्य दिव्यांग व्यक्तींचाही समावेश होता. लस घेण्यासाठी पहाटेपासून लावाव्या लागणाऱ्या रांगा, तासन्-तास उभे रहावे लागत असल्याने दिव्यांग व्यक्तींची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे शहरातील दिव्यांग व्यक्तींचे लसीकरणासाठी एक वेगळा दिवस मिळावा, अशी मागणी सातत्याने होत होती.
अखेर नगरपरिषद आरोग्य विभागाने याबाबत निर्णय घेत जिल्हा पातळीवरून मंजुरी मिळविली. त्यानुसार ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दुपारपर्यंत ३० जणांना लस दिली. त्यानंतर ही लसीकरण सुरू होते. दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर उपलब्ध केल्या होत्या. ज्या व्यक्तींना लसीकरण केंद्रात येता आले नाही, त्यांना रिक्षामध्ये जाऊन आरोग्य सेविका दीपाली चिले व सहकाऱ्यांनी लस दिली. यावेळी नगरपरिषद आरोग्य सभापती शशिकांत मोदी, लिपिक राजेंद्र खातू, अनिल राजेशिर्के, आरोग्य विभागाच्या कविता खंदारे, प्रियंका गमरे, मोहन गोलामडे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेखा राजेशिर्के यांनी या लसीकरण मोहिमेसाठी मेहनत घेतली.