लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. सरीवर कोसळणारा पाऊसही मोठ्या कालावधीनंतर हजेरी लावत आहे. पाऊस कमी झाल्याने विहिरी, नदी, धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे लागवडीची शिल्लक राहिलेली कामे शेतकरी उरकत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ९३९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत ११ हजार ७३२.९१ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ११ हजार २०६.९९ मिलिमीटर पाऊस जास्त झाला आहे. दिवसभरात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस मंडणगड तालुक्यात झाला आहे.
पावसामुळे मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांत कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. मात्र, चिपळूण तालुक्यात पोलदवाडी येथे दरड कोसळली असली तरी जीवितहानी झालेली नाही. तळसर ग्रामपंचायतीलगतचा पूल वाहून गेल्याने धनगरवाडी, बाैद्धवाडीचा संपर्क तुटला आहे. येगाव येथे दोन घरांवर दरड कोसळली असली तरी जीवितहानी मात्र झालेली नाही. पेढांबे येथे घरात पुराचे पाणी शिरल्याने विनोद सकपाळ यांचे १,६४० रूपये, सुजाता शिंदे यांचे २२,६०० रूपये, पेढांब बसस्टाॅपचे ५० हजार रुपये, चंद्रशेखर शिंदे यांच्या शेतीचे १० हजार रुपये तर अन्नधान्याचे ३५ हजार ६०० रुपये, अभिषेक शिंदे यांच्या दुकानाचे दोन लाख पन्नास हजार रुपये, रघुनाथ सकपाळ यांच्या दुकानाचे ५२ हजार ५०० रुपये, विलास कदम यांच्या दुकानाचे सात लाख ५० हजार रुपये, मुस्लिम दर्ग्याचे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर येथील पांडुरंग येडगे यांची संरक्षक भिंत पडून ५० हजार रुपये, आंबेड बुद्रुक येथील भाटकर यांच्या १२ शेळी, १,२५० कोंबड्या गुदमरून मृत पावल्या. ताम्हाणे येथे संरक्षक भिंत खचली आहे. ओझरे बुद्रुक येथे पूल वाहून गेला असून, राजिवलीतील शीतल कदम यांच्या घरावर मातीचा ढिगारा पडून काैलांचे नुकसान झाले आहे. रातबी नदी परिसरातील शेती वाहून गेली आहे. निवळी निवसारवाडी रस्त्यावर भेग पडून रस्ता बंद झाला आहे.