राजापूर : जैतापूरहून सकाळी ६.४५ वाजता सुटणारी जैतापूर-हातीवले-तरळे-कोल्हापूर-सांगली जाणारी व परतीला दुपारी १.३० वाजता सांगलीवरून सुटणारी सांगली-कोल्हापूर-तरळे-हातीवले-राजापूर-डोंगरमार्गे-जैतापूर अशी गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी येथील जैतापूर ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस सरफराज काझी यांनी केली आहे.
ही गाडी सुरू करण्याबाबत त्यांनी एस.टी. महामंडळाकडे पत्रही दिले आहे. जैतापूर-कोल्हापूर ही गाडी यापूवीर्ही बारमाही सुरू होती. कालांतराने ती बंद झाल्याने जैतापूर परिसरातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही गाडी यापूर्वी खारेपाटण-भुईबावडामार्गे सुरू होती. परंतु, तरळेमार्गे गाडी सुरू केल्यास जैतापूर परिसरातील लोकांना खारेपाटण, तरळे, कणकवली येथे जाणेही सोयीचे हाेणार आहे.
त्याचबरोबर जैतापूर परिसरातील लोकांना कोल्हापूर, सांगली येथील वैद्यकीय उपचारांसाठी उपयुक्त ठरेल, अशी ही फेरी होईल. या फेरीला चांगले भारमान मिळू शकते. त्यामुळे जैतापूर-कोल्हापूर-सांगली गाडी जैतापूर वस्तीची बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी काझी यांनी एस.टी. आगार प्रशासनाकडे केली आहे.