रत्नागिरी : रत्नागिरीच्या सामाजिक क्रांतीचे अग्रणी आणि आयदानकार उर्मिला पवार यांचे आजोबा हरी गोविंंद पवार आणि त्यांची बहीण फटीआक्का यांच्या समाधींचा जीर्णोध्दार फणसवळे येथे नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.
महात्मा फुले यांनी १८७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव रत्नागिरीतील फणसवळे गावात रहाणाऱ्या सोल्जर हरी गोविंद पवार यांच्यावर होता. ते पुण्याला सैन्यात होते. रिटायर्ड होऊन गावी आले. त्या काळात अस्पृश्यांची लग्ने, धर्मीक विधी विटाळ होईल म्हणून भटजी झाडावर चढून करत असत. हरी पवार यांनी याला विराध करत आमचे विधी आम्ही करू असे भटजीना ठणकावले. त्यावेळी भटजींनी संस्कृत आणि प्राणायाम येतो का विचारले व याचा खरेपणा बघायला अट घातली व वरून बंद केलेल्या खड्ड्यात सात दिवस बसण्याची पैज लावली. हरी पवार यांनी ती पैज जिंकली. मसणातून परत आला म्हणून लोक त्यांना मसणगिरी बुवा म्हणू लागले.हरी पवारनी सत्यशोधकी धार्मिक विधी करण्यासाठी आपल्या आणि अनेक गावातल्या तरूणांना उभे केले. त्यांची बहीण फटीआक्का असे तिला म्हणत. तिलाही पंचांग बघायला लग्नविधी करायला शिकवले. तीही पंचांग बघून मुहूर्त सांगत असे. पूजा, लग्ने लावत असे. रत्नागिरी जिल्ह्यातील फणसवळे गावात या दोघांच्या १९ व्या शतकात बांधलेल्या समाधी आहेत. या समाधींचा जीर्णोद्धार नवनिर्माण महाविद्यालयाचे संस्थापक अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नवनिर्माण महाविद्यालयाचे प्रा. सुकुमार शिंदे, लेखिका उर्मिला पवार, शाहू पवार, राजेंद्र कदम, अरूणा जगियासी, रवी पवार उपस्थित होते. या वेळी फणसवळे गावातील अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या मुलांना या सत्यशोधक भाऊ बहिणीच्या नावाने भेटवस्तू देण्यात आल्या.