रत्नागिरी : कोरोना संसर्गामुळे गतवर्षीपासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण शांततेत साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका मात्र अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. दि.२१ जुलै रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण असून अत्यंत साधेपणाने सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद किंवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी.
बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचेही पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.