खेड : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानी गावात दाखल झाले हाेते. मात्र, शिमगोत्सवासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केल्यामुळे यावर्षी शिमगाेत्सवाचा उत्साह कमी दिसत हाेता. प्रशासनाने पालखी घरोघरी नेण्यास बंदी कायम ठेवल्यामुळे ग्रामीण भागात निरुत्साही वातावरण हाेते. शेकडो वर्षांची परंपरा असलेली पालखी घरोघरी नेण्याची प्रथा या निर्बंधांमुळे खंडित झाली.
गेल्या आठ दिवसांत ग्रामीण भागातील मानकरी, ग्रामस्थ व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तालुका मुख्यालयात परवानगी मिळविण्यासाठी धडपडताना दिसत होते. परवानगीसाठी अर्ज घेऊन येणाऱ्या ग्रामस्थ, भाविकांना प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयातून येणाऱ्या आदेशाची झेरॉक्स प्रत देण्यात येत होती. ग्रामीण भागातील परवानगी मिळण्याच्या आशेने आलेल्या नागरिकांना आदेशाची प्रत घेऊन विन्मुख होऊन परत जावे लागले. तालुक्यातील मानाच्या पालख्या यावर्षी घरोघरी न नेता एकाच ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय अनेक गावांमध्ये घेण्यात आला हाेता. गावात बैठक घेऊन शासनाचे नियम न डावलता साधेपणाने यावर्षी शिमगोत्सव साजरा करणे ग्रामस्थांनी पसंत केले हाेते.
चाैकट
नऊ ठिकाणी कंटेन्मेंट झाेन
तालुक्यातील नऊ ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. एकूण १५ गावात या महिन्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. शहरातील सहा भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे काेराेना वाढीचा धाेकाही अधिक वाढला हाेता.