दापोली : अनेक दिवस तारखा पुढे-पुढे जात असलेल्या आशापुरा माईनकेम कंपनी विरोधातील तक्रारीचा निपटारा झाला असून, कंपनीला कौल मिळाला आहे.या कंपनीमुळे पर्यावरणाची हानी होऊन स्थानिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार इम्तीयाज हळदे, अशोक रोडावत यांनी दिली होती. या तक्रारीनुसार प्रांताधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस देऊन सीआरपीसी १४२ने आशापुरा कंपनीचे उत्खनन बंद ठेवण्याचे निर्देश २० फेब्रुवारी रोजी दिले होते. त्याचा निकाल देण्यात आला आहे.बॉक्साईट उत्खननाचे गेली १० वर्षे काम करणाऱ्या या कंपनी विरोधात अचानक जनतेचा उद्रेक झाला. कंपनी बेकायदेशीर काम करत असल्याची तक्रार काही लोकांनी केली. आता कंपनीच्या बाजूने निकाल लागल्याने पुन्हा रोजगाराच्या संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया देण्यात येत आहे.आशापुरा मायनिंगच्या कन्व्हेअर बेल्टमुळे प्रदूषण होत असल्याने तो बंद करण्याचा निकाल प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. परंतु, दुसरीकडे केळशी, उंबरशेत, रोवले या गावाशेजारी बॉक्साईट उत्खननाचे काम सुरु आहे. या उत्खननाच्या कामामुळे कसल्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याचा निकाल देण्यात आल्याने केवळ दिशाभूल करणारा हा निकाल आहे. प्रांंताधिकाऱ्यांनी हा पूर्वग्रहदूषीत निकाल दिला आहे. अशोक रोडावत यांनी अपर जिल्हाधिकारी यांचेकडून स्थगिती आणली होती. परंतु, तो आदेश फेटाळून लावत निकाल जाहीर करण्याची घाई करण्यात आल्याचा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी श्रीराम ईदाते उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांवर अन्याय : केदार साठेआशापुरा मायनिंगच्या बाजूने देण्यात आलेला हा निकाल म्हणजे स्थानिकांवर अन्याय करणारा आहे. कारण या निकालावरुन स्पष्ट झाले आहे की, अधिकाऱ्याने निकाल चुकीचा दिला आहे. न्यायासाठी आपण पुढील न्यायालयात जाणार असल्याचे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
निकालाचा कौल ‘आशापुरा’च्या बाजूने
By admin | Published: May 14, 2016 12:08 AM