चिपळूण : शहरातील गुहागर बायपास रोडजवळ पागमळा येथील शेतात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ चिपळूण नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास गोपाळ सावंत (६०) यांचा अज्ञाताने हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
या घटनेमुळे चिपळुणात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी भेट देवून तपास केला. ही हत्या मालमत्तेवरुन झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.चिपळूण शहरातील पागमळा येथे राहणारे रामदास गोपाळ सावंत हे मंगळवारी सायंकाळनंतर घरातून बाहेर पडले. रात्री ८.३० पर्यंत एका गॅरेजच्या ठिकाणी दिसून आले होते. त्यानंतर ते घरी आले नाहीत. बुधवारी सकाळी ७ ते ७.१५ च्या दरम्यान पाणी सोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.यावेळी घटनास्थळी चिपळूणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बडेसाहेब नायकवडे व इतर पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर या परिसरात शोधाशोध व पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला होता, त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल बंद अवस्थेत सापडला. या घटनेचा पंचनामा चिपळूण पोलिसांनी केला आहे.
याबाबतची फिर्याद श्रीराम गोपाळ सावंत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिल्यानुसार अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या मंगळवारी रात्री ८.१५ ते बुधवारी सकाळी ८.१५ च्या कालावधीत घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या अंगावरील ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. त्यामध्ये ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, ३० हजार रुपयाचे ब्रेसलेट व २० हजार रुपये किंमतीची अंगठी असा एकूण ९० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. दरम्यान सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नगर परिषदेत प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे सर्वाचे ते परिचित असल्याने ही बातमी समजताच यावेळी घटनास्थळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, नगरसेवक शशिकांत मोदी, आशिष खातू, उमेश सकपाळ, आबा कापडी, रतन पवार, रमेश खळे, महेश दिक्षित, विजय चितळे आदी सर्वपक्षी राजकीय नेते व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुले असा परिवार आहे. सावंत यांची हत्या मालमत्तेवरुन झाली असावी असा प्राथमिक अंदाज रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. यावेळी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. हे श्वानपथक पाण्याच्या टाकीजवळील परिसरात घुटमळले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.सावंत यांच्या मृतदेहापासून काही अंतरावर त्यांची नवीकोरी दुचाकी उभी करून ठेवण्यात आली होती. सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच ती खरेदी केली होती. रामदास सावंत हे चिपळूण नगर परिषदेमध्ये १९८३ साली रुजू झाले. सुरुवातीला ते जकात लिपीक, वरिष्ठ लिपीक, प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. दि.३१ नोव्हेंबर २०१५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी चिपळूण शहरातील श्री कालभैरव ट्रस्टचे विश्वस्त, नॅब आय हॉस्पीटलचे विश्वस्त होते.