राजापूर : दिवसागणिक हवेतील उष्मा आणि तापमान वाढत असताना शहरानजीकच्या उन्हाळे येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्री गंगामाईचे आगमन झाले आहे. तब्बल ७५ दिवसांनंतर १५ मे रोजी गंगामाईचे आगमन झाले असून, सद्यस्थितीमध्ये मूळ गंगा, काशिकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती गंगा देवस्थानचे पदाधिकारी श्रीकांत घुगरे यांनी दिली.शहरानजीकच्या उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्या दृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात विविध राज्यांतील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात. मात्र, कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेक भाविकांना गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. अशा स्थितीमध्ये गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे फेब्रुवारी महिन्यामध्ये निर्गमन झाले होते. त्यानंतर, ७५ दिवसांनंतर पुन्हा एकदा गंगामाईचे आगमन झाले आहे.सद्यस्थितीमध्ये मूळ गंगेसह गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवास असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे पुन्हा एकदा आगमन झालेले असले तरी, भाविकांची गंगास्नानासाठी फारशी गर्दी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गंगा - धूतपापेश्वर विवाहाची प्रथागंगेचा राजापूरनजीक असलेल्या धूतपापेश्वरशी विवाह सोहळा होतो. यापूर्वी २००३-०४ साली गंगा आणि धूतपापेश्वर यांचा विवाह सोहळा पार पडला होता. हा सोहळा प्रतिवर्षी होत नाही. त्यामुळे आजपर्यंत हा विवाह साेहळा झालेला नाही.
- यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या गंगामाईचे आगमन व गमन या कालखंडाला छेद मिळाला आहे.
- मागील काही वर्षात सलग दुसऱ्या वर्षीही गंगेचे आगमन झाल्याची घटना घडली आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज, आर्याकार कवी मोरोपंत गंगाक्षेत्रावर आल्याची इतिहासात नोंद मिळते.
- गंगा क्षेत्राचा आणि काशीचा संबंध असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला मिळते.
- प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे जाणवते.
- गंगेच्या आगमनापूर्वी हिवाळ्यात उष्ण स्वरूपाचे वारे वाहतात. गंगेच्या आगमनाची ती चाहूल असते.