लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या मुद्रांक सवलत योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतल्याने सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत २२,०११ दस्तांची नोंदणी झाली. यातून तब्बल ४९ कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. केवळ मार्च महिन्यातच ९ कोटी ६७ लाखांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी वाय.बी. जंगम यांनी दिली.
कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊनकाळात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मंदीचे सावट होते. त्यामुळे गतवर्षी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान दस्तांची नोंदणी झालीच नाही. जूननंतर दस्तनोंदणीला हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. बांधकाम क्षेत्रावरील मंदी दूर व्हावी, तसेच सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करता यावे, या उद्देशाने शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत योजना दोन टप्प्यांत जाहीर केली. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शासनाने तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलत योजना जाहीर केली होती. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत दोन टक्क्यांची सवलत होती.
सप्टेंबर महिन्यात शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत योजना जाहीर करताच लाॅकडाऊन काही अंशी शिथिल झाल्याने नागरिक घरखरेदीसाठी बाहेर पडू लागले. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या पहिल्या टप्प्यात १०,४३६ दस्तांची नोंदणी झाली असून शासनाला २६ कोटी ८४ लाख ९४ हजार ३ रुपये इतका महसूल मिळाला आहे. तसेच १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ८२७२ दस्तांची नोंद करण्यात आली. त्यातून २२ कोटी ५७ लाख ३९ हजार ८८० रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
१ एप्रिल २०२१ पासून मुद्रांक शुल्क पुन्हा ५ टक्के होणार असल्याने नागरिकांनी मार्च महिन्यात या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला. ३१ मार्च रोजी रात्री दीड वाजेपर्यंत दस्तनोंदणीसाठी या कार्यालयाबाहेर माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे केवळ मार्च महिन्यातच या कार्यालयाचा महसूल ९ कोटी ६७ लाख २८ हजार ७६ रुपये इतका झाला. या महिन्यात ३३०३ दस्तांची नोंदणी करण्यात आली.
चौकट
कालावधी दस्तनोंदणी जमा महसूल
१ सप्टेंबर २० ते मार्च २१ २२,०११ ४९,४२,३३,८८३
१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २० १०,४३६ २६,८४,९४,००३
१ जानेवारी ते ३१ मार्च २१ ८,२७२ २२,५७,३९,८८०
१ ते ३१ मार्च २१ ३३०३ ९,६७,२८,०७६.