रत्नागिरी : गेली १० वर्ष बंद असलेली रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा पुनर्जीवित करावी, अशी मागणी ग्रामस्थ, कामगार, ठेकेदार यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. न्यायालयाने कोणत्या तरी चांगल्या कंपनीला कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. त्यासाठी काेणाची मदत घ्यावी लागली तरी आम्ही ती घेऊ, पण कंपनी सुरू हाेऊ दे, अशी मागणी ठेकेदार दीपक किर यांनी केली. आम्ही सर्व एकत्र येऊन लढणार असून, यामध्ये काेणताही श्रेयवाद नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारती डिफेन्स आणि इन्फ्रा लिमिटेड पूर्वी भारती शिपयार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क़ंपनीने १९७३ सालापासून देशभरातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कंपनीचे एकूण ६ यार्ड आहेत. त्यापैकी ३ यार्ड हे महाराष्ट्र राज्यात आहेत. सन २००७ ते २०१३ हा कालावधीत कंपनीकडे खूप काम होते. २०१३ सालानंतर जहाज बांधणी उद्याेगातील जागतिक मंदीमुळे जगातील सर्व जहाजबांधणी प्रकल्प कोसळण्यास सुरुवात झाली. शासकीय कंपनीकडून कंपनीला २४ जहाजांची ऑर्डर मिळाली होती. काही जहाजांचे बांधकाम सुरू असून, बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत, तसेच रो-रो प्रकारच्या वेसल, एलएनजी चालवणाऱ्या जहाजांची कामेही टप्प्यात आहेत. कंपनीमध्ये उत्कृष्ट दर्जाजी जहाजे उपलब्ध आहेत, जर कंपनी शिपबिल्डिंग नसलेल्या गुंतवणूकदारांना विकली तर जहाजांची नासाडी होईल, असे कीर यांनी सांगितले.
२०१४ सालापासून ही कंपनी एडेलविस मालमत्ता पुनर्रचनाच्या नियंत्रणाखाली आहे. कंपनीच्या मालमत्तेच्या पुनर्गठनासाठी १२०० करोड देण्याचे ठरले होते, पण प्रत्यक्ष मात्र ३० कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरीतून १० जहाजांची निर्मिती केली होती. या कंपनीला वॉरशिप बांधायची परवानगी आहे व ही कंपनी देशासाठी उत्कृष्ट जहाजही बनवू शकेल. सध्याच्या घडीला कंपनी सुरू करण्यासाठी ५० कोटींचे आर्थिक बळ मिळाले तर कंपनी नक्की सुरू होऊ शकेल, असा विश्वास सांगितला.
नितीन गडकरींचीसुद्धा भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीही भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत सावंत, तन्वीर खान, भाई सावंत, दीपक किर, राजेश तिवारी व परेय सावंत व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कंपनीसमोर आंदोलन
सोमवारी सकाळी १० वाजण्याचा दरम्यान जयहिंद चौक येथील व मिऱ्या बंदर येथील ग्रामस्थ, कामगार व ठेकेदार यांनी कंपनीच्या समोर उभे राहून आंदोलन केले. यावेळी त्यांनी एडलवाईस तुम्ही आमची बहुमूल्य नोकरी हिरावून का घेतली, एडलवाईस सर्वांत मोठा चोर आहे, एडलवाईस कंपनी भंगारात विकायची आणि मोठा फायदा करायचा आहे. अशाप्रकारचे विविध फलक घेऊन ग्रामस्थांनी कंपनीसमोर तब्बल दीड तास आंदोलन केले.