होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या रात्री रोंबाट हा पारंपरिक सांस्कृतिक प्रकार सर्वत्र साजरा होतो. आपापल्या वाडीतील होळीसमोर कवळे पेटवून व ती पेटती कवळे डोक्यावर घेऊन नाचत नाचत व फाका घालत प्रत्येक वाडीचे पथक गावातील मुख्य देवळात जाते. एकाच मुख्य कार्यक्रमाऐवजी अनेक विविधरंगी छोट्या छोट्या कार्यक्रमांची सरमिसळ म्हणजेच ‘रोंबाट’.
प्रत्येक वाडीचे तमाशापथक रात्री देवळात असा रोंबाटाचा कार्यक्रम सादर करते. हे तमाशापथक घाटावरच्या प्रचलित तमाशा पथकासारखे नाही. केवळ होळीपुरत्या गण, गौळण व कृष्णलीलांवर आधारित एखाद्या गमतीशीर नाटुकल्याचा हा कार्यक्रम असतो. मध्येच त्या त्या पथकातील सोंगाडे काही गमतीजमती करून सर्वांचे मनोरंजन करतात. वाडीतील एखाद्या बापयाला किंवा पोरग्यालाच स्री वेषात ‘कोळीण’ बनवून हा कृष्णलीलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो. ही कोळीण म्हणजेच राधा गौळण, तिच्यासोबत आयत्यावेळी लुगडे गुंडाळलेला बापया म्हणजेच म्हातारी ठकी मावशी, सोबत भगवान श्रीकृष्ण, त्याचा पठ्ठा सोबती पेंद्या अशी ही पात्रे असतात. भगवान श्रीकृष्णाच्या राज्यात रस्ताकर चुकवित बाजाराला जाणाऱ्या गौळणी, त्यांच्याकडून कर वसूल करण्यास आलेल्या पेंदेरावांची गौळणींकडून होणारी ‘धुलाई’ आणि शेवटी भगवान श्रीकृष्णाचा प्रवेश अशी ही थोडक्यात व पारंपरिक आख्यायिका असते. गण, गौळण यांसारख्या गीतांचा सामावेश असलेला हा कार्यक्रम आजही तितकाच लोकप्रिय आहे.
आता अशा कार्यक्रमासाठी तरुण मुले सहसा तयार होत नाहीत. लुगडे नेसण्यास कोणी पोरगा सहसा धजावत नाही. मात्र, काही ठिकाणी हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वतःहून पुढे येणारी मुलेही आहेत. मात्र, फट्याआबाने वर्षांनुवर्षे साकारलेला पेंदेराव, बाबुराव गावकराने साकारलेला भगवान श्रीकृष्ण, पक्याची बाळे सुंदरी, भरत्याचा सोंगाड्या, आप्पा मांगरकराची ढोलकीची साथ, शिरीबुवाच्या आवाजातले गण व गौळणी, अशोकाने खूप वर्षे साकारलेली कोळीण यांसारख्या काही व्यक्तिरेखा मात्र अजरामर झाल्या आहेत. आज फट्याआबा, आप्पा मांगरकर, शिरीबुवा किंवा बाबुराव गावकार या जगात नाहीत. मात्र, दरवर्षीच्या रोंबाटात त्यांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावतात. रोंबाटाचा कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक वाडीचे असे पथक गावात घरोघरी जाऊन गण, गौळण सादर करते. प्रत्येक घरी या पथकाला यथाशक्ती बिदागी मिळते. कोकणातला सांस्कृतिक वारसाही जपला जातो आणि अशा प्रासंगिक रंगभूमीवर वावरणाऱ्या अशा कलाकारांच्या खिशात चार पैसेही जमतात. त्यामुळेच पारंपरिक असले तरीही तितकेच लोकप्रिय असणारे हे रोंबाट कोकणाच्या सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वाचे पान आहे.
बाबू घाडीगावकर,
जालगाव, दापोली.