खेळामध्ये कर्तृत्व गाजवणारे अनेक खेळाडू आपल्या सभोवताली असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या कर्तृत्वाला सुयशाची सुंदर किनार लागते. खेळाडूंचा फिटनेस आवर्जून वाचणारे, एक तरुण वकील अॅड. सुधीर रसाळ यांनी आतापर्यंत दहा मॅरेथॉन स्पर्धा गाजवल्या. फार पूर्वी काही खेळादरम्यानच्या दुखापतीमुळे माझा सल्ला घ्यायला आले होते. खेळाची समज, जिद्द, चिकाटी, संयम आणि शिस्त अंगी बानवणारे हे तरुण वकील यांना मी सहज त्यांना फिजिओथेरपी देताना म्हटलं, ‘रसाळ साळेब, खेळ म्हटलं की दुखापत आलीच. त्यावर लगेच उपचार करावेत. पुन्हा खेळण्यासाठी सज्ज व्हावे.’ हे त्यांनी कायम लक्षात ठेवले. मॅरेथॉनच्या स्पर्धांत आपला व्यवसाय सांभाळून ते भाग घेतात. दिनांक ४ एप्रिल २१ चा फिटनेस वाचला, त्यातलं एक वाक्य त्यावर ते भरभरून बोलले. खेळाडूंना बरे होण्यास फार कमी वेळ लागतो.
हाच धागा पकडून आपण आता खेळादरम्यानच्या दुखापतीतील ‘राइस’ तत्त्व उपयोगात आणूया. पण प्रथम आपण मनात आणि खेळातही सकारात्मक राहू या. अर्थात नियमित खेळामध्ये ही मनाला सकारात्मकतेची, क्रियात्मकतेची सवय जडते; पण तरीही दुखणं आलं, तरीही विचलित होऊ नये. हे पहिलं ब्रीद आहे. आर (R) म्हणजेच पहिल्यांदा दुखापत झाल्याबरोबर त्या भागाला, अवयवयाला, सांध्याला किंवा स्रायू गटाला आराम द्या. त्या स्रायूला आराम देणं, विश्रांती देणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही वेळेस थोडा वेळ, काही वेळ, काही तास आणि काही वेळेस काही दिवस आणि आठवडे लागू शकतात. मात्र, तो स्रायू पूर्ण बरा होतो. म्हणून ‘रेस्ट’ हा कुठल्याही खेळातील दुखापतीत बरं होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या ‘रेस्ट’ तत्त्वातूनही अजून स्फूर्ती मिळते, हे ही ध्यानात घ्यायला हवं. दुसरा परवलीचा शब्द आहे, आइस (I). म्हणजेच त्या दुखावलेल्या भागाला बर्फ लावावा.
या बर्फाच्या शेकामुळे त्या स्रायूतील सूज ओसरते. नवं ताजं रक्ताभिसरण त्या दुखावलेल्या भागात पोहोचतं. साधारण त्वरित त्या भागाला बर्फ लावावा. साधारण दिवसातून गरजेनुसार दोन तीन वेळा लावावा. मात्र, त्याचं ही एक तत्त्व आहे. एका वेळेस ‘२०’ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बर्फ लावू नये. काही वेळेस टॉवेलमध्ये बर्फ गुंडाळूनही तो अवयवावर ठेवता येतो. बर्फामुळे रक्तवाहिन्या आंकुचन पावतात. त्यामुळे ती स्पेस किंवा जागा भरून येण्यासाठी रक्ताचा प्रवाह त्या भागात जोमाने जातो. त्यातून दुखणं कमी करणारी रसायनं जी तयार होतात, ती वेळेत पोहोचतात. दुखावलेला भाग बरा होतो. अर्थात जे खेळाडू मधुमेही आहेत, हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहेत किंवा काही रक्तवाहिन्यांच्या आजारात त्यांनी काळजीपूर्वक बर्फ लावावा. कमी वेळ लावावा. मात्र, खेळाच्या मैदानात त्वरित आरामासाठी आणि पुढील संभाव्य दुखापत टाळण्यासाठी बर्फ लावणे हा रामबाण उपाय आहे.
स्वत:च्या अनुभवातून सांगतो, जिममधले नवे जिम सुरू करणारे, यांना बऱ्याचवेळा अशा ‘टेण्डॉन दुखापतीस (यालाच कंडरा म्हणतात. मी याला ‘अनुबंध’ नाव दिले आहे.) सामोरे जावे लागते. म्हणून जवळजवळ प्रत्येक जिमच्या ट्रेनरला हे तत्त्व समजावून दिले आहे. त्याचे रिझल्टस अर्थातच उत्तम आहे. कारण याला वैद्यक संशोधकीय भक्कम पुरावा आहे. सिद्धी आहे.
खेळाच्या ‘राइस’मधलं तिसरं तत्त्व आहे - ‘कॉम्प्रेशन’ (Compression) यामुळे सूज ओसरते. फक्त किती घट्ट असावे, हे त्या त्या स्थितीवर अवलंबून असते. अर्थात एवढेही घट्ट असू नये की त्यामुळे दाबण्यामुळे होणारे त्रास वाढतील. सहसा पायाच्या दुखापतीमध्ये असं इलॅस्ट्रो क्रेप बँडेजने बांधणे किंवा तत्सम पट्ट्याने बांधणे सूज ओसरण्यास आणि दुख कमी करण्यास मदतगार ठरते.
आणि खेळाच्या ‘राइस’मधलं चौथं तत्त्व आहे, ‘ऐलिव्हेशन’ म्हणजेच दुखापत झालेला भाग साधारण हृदयापेक्षा वर धरून ठेवणे किंवा आधाराने धरून ठेवणे. याचा फायदा सूज जमा करणारे घटक यांचा निचरा होतो. एवढ्या गोष्टी कुठल्याही खेळाडूंनी लक्षात ठेवाव्यात. दुखणं कमी झालं की पुन्हा हळूहळू खेळाला सुरुवात करावी. खेळाडूंच्या दुखापतीमध्ये ‘राइस’च हे तत्त्व एक खेळाडू यांना वरदान आहे.
(क्रमश:)
- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी