रत्नागिरी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हेही होते.
यावेळी पालकमंत्री परब यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची माहिती दिली. सध्या लसीचा साठा अपुरा पडत असल्याने सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींचा दुसरा डोस राहिला असेल, त्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. त्यांची ऑनलाइन नोंदणी झाली की त्यांना अगोदर डोसबाबत कळविण्यात येईल. सध्या रुग्णसंख्या वाढती असल्याने जिल्ह्याला रेमडेसिविरची ५२२० इंजेक्शन्स मिळाली आहेत. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन अधिक बेड्स वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने २०० बेडचे महिला कोविड रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथेही ६२ बेड्स वाढविण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी बॅडमिंटन कोर्ट येथे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.
आढावा बैठकीत ऑक्सिजन पुरवठ्याचाही आढावा घेण्यात आल्याचे परब यांनी सांगितले. महिला रुग्णालयात २० व्हेंटिलेटर्स बेड्स वाढविण्यात येणार आहेत. कामथे जिल्हा रुग्णालयात १२, राजापूर ग्रामीण रुग्णालयात १२ असे जिथे जिथे आवश्यक आहेत, तिथे वाढविण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे परब यांनी सांगितले. तसेच ३५ ते व्हेंटिलेटर बेडस वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कुुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री परब यांनी दिली. जिल्ह्याची सद्य:स्थिती दिलासादायी असल्याचे त्यांनी सांगितले.