रत्नागिरी : जिल्ह्यात दाेन दिवस काेसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याचे रत्नागिरीच्या पाटबंधारे मंडळाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत नाेंदविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ७६.११ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. सर्वात कमी खेड तालुक्यात १४.८५ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने सरींवर काेसळण्यास सुरुवात केली हाेती. रात्री मुसळधार काेसळणारा पाऊस दिवसा मात्र, विश्रांती घेत हाेता. मात्र, शुक्रवारपासून पावसाने जाेर धरला हाेता. शनिवारी दुपारपासून पावसाचा जाेर कायम हाेता. मात्र, रविवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली हाेती. दाेन दिवस मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, साेनवी, काजळी, काेदवली, मुचकुंदी आणि बावनदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत नाेंदविलेल्या आकडेवारीनुसार एकूण ४१६.८९ मिलीमीटर तर सरासरी ४६.३२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ७६.११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांमध्ये मंडणगड ४८ मिलीमीटर, दापाेली २३.५० मिलीमीटर, खेड १४.८५ मिलीमीटर, गुहागर ३६.८० मिलीमीटर, चिपळूण ५५.८८ मिलीमीटर, संगमेश्वर ३४.७५ मिलीमीटर, लांजा ६० मिलीमीटर आणि राजापूर ६७ मिलीमीटर इतक्या पावसाची नाेंद झाली आहे.
नद्यांची पाणीपातळी (मीटरमध्ये)नदीचे नाव - इशारा पातळी - धाेका पातळी - सध्याची पातळी
- जगबुडी (खेड) ५.०० - ७.००- ३.३०
- वाशिष्ठी (चिपळूण) ५.००- ७.०० - १.५०
- शास्त्री (संगमेश्वर) ६.२० - ७.८०- ०.४०
- साेनवी (संगमेश्वर) ७.२० - ८.६० - ०.२०
- बावनदी (संगमेश्वर) ९.४० - ११ - १
- काजळी (लांजा) १६.५० - १८.५० - ११.२९
- मुचकुंदी (लांजा) ३.५० - ४.५० - ०.२०
- काेदवली (राजापूर) ४.९० - ८.१३ - १.६०.