रत्नागिरी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला आहे. वाहतूक भाडे वाढल्याने किरकोळ भाजीविक्रीच्या दरात वाढ झाली आहे.इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक भाडे वाढले. परिणामी, भाजीच्या दरात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत. खाद्यतेलाचे भाव कडाडले असून, एक लीटरसाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत.
कांदा ५० ते ६० रुपये, बटाटा २५ रुपये तर लसूण १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र, परजिल्ह्यातील शेतकरी शंभर रुपयास सव्वा ते दीड किलो लसूण, तर कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकत आहेत.परजिल्ह्यातील विक्रेतेपरजिल्ह्यातून विक्रेते शहर, तसेच जिल्ह्यात येत आहेत. ट्रक भरून कांदा, बटाटा, लसूण विक्रीसाठी आणत असून, बाजारभावापेक्षा कमी दरात विकत असल्याने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील नाक्या-नाक्यावर दहा किलोच्या बॅगांतून कांदा विक्री करीत असून, ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.अननस मुबलकसध्या बाजारात कलिंगडासह अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पिकलेले अननस ६० ते ७० रुपये प्रति नग दराने विक्री सुरू आहे. हातगाडी विक्रेते शहरातील गल्लीबोळातून विक्री करीत आहेत.बिस्कीटे गिफ्टखाद्यतेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सहा महिन्यांत तेलाचे दर लीटरमागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाद्यतेल खरेदीवर भेटवस्तू जाहीर केली आहे. एका कंपनीकडून चक्क बिस्किटचे पुडे दिले जात आहेत.
महागाईवर शासनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसत आहे. इंधनदर वाढ झाली की, भाजीपाला, फळे, तसेच अन्य वस्तूंची दरवाढ होत आहे. दरवाढीवर नियंत्रण गरजेचे आहे.- प्रभा देसाई, गृहिणी
कोरोनामुळे वर्षभरात आर्थिक समस्येला सर्वांनाच सामोरे जावे लागले. त्यातच महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य होरपळत आहेत. सामान्य जनतेचा शासनाने विचार करून अंमलबजावणी करावी.- शैलजा पाटील, गृहिणी