संदीप बांद्रे
चिपळूण : युरोपचे हृदय मानल्या जाणाऱ्या युक्रेनवर ताबा मिळण्यासाठी रशियाकडून अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावेळी अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि तितक्याच तातडीने रशियाने हल्ला करण्यास सुरवात केली. जशी जशी हल्ल्याची भीषणता वाढत होती, तशी आमची धाकधूक वाढत होती. आपण शिकत असलेली उजक्रोड इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी युक्रेनमध्येच हंगेरी सीमेलगत असल्याने तिथे फारसा धोका नव्हता. तरीही काही क्षण अक्षरशः थरकाप उडवणारे होते, असा अनुभव युक्रेनमधून आपल्या घरी, खेर्डी (चिपळूण) येथील पतरलेल्या ऋषभनाथ मोळाज याने मांडला.
वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेला ऋषभनाथ मंगळवारी चिपळुणात दाखल झाला. लोकमतशी बोलताना तो म्हणाला, युक्रेन-रशियाचे वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. युक्रेनचा विकास दर रशियाच्या कितीतरी पटीने अधिक असून, तो विकसित देश आहे. २२ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ले सुरू झाले. विमानतळ, रेल्वेस्थानक तसेच तेथील राष्ट्रीय प्रकल्पांवर बॉम्बहल्ले झाले. त्यामुळे धाकधूक वाढली. त्यावेळी आमच्या परिसरात सायरन वाजवून कर्फ्यू लावण्यात आला. मात्र हे हल्ले ३०० किलोमीटरवर होत असल्याने आम्ही सुरक्षित होतो. विद्यापीठापासून २० किमीवर हंगेरीची सीमा होती. त्यामुळे धोका वाढल्यानंतर शेजारच्या हंगेरी देशात त्वरित स्थलांतराचे नियोजन विद्यापीठाने केले होते. ऐनवेळी हल्ला झाल्यास बंकरमध्ये राहण्याचीही व्यवस्था होती. तिथे असतानाच तीन दिवस संचारबंदी होती.
दरम्यान, भारतीय दूतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर चिंता काहीशी मिटली. कुटुंबीय आणि नातेवाईक सारखे संपर्कात असायचे. वास्तव्याच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी असल्याने फारशी अडचण झाली नाही. भारतीय दूतावासाकडून आम्हाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले. परतीचा प्रवास उजक्रोड, बुडापेस्ट, हंगेरीमार्गे दिल्लीपर्यंत झाला. दिल्लीत विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीतून मुंबई व मुंबईतून चिपळूणला मंगळवारी पहाटे ५ वाजता पोहोचलो. घरी आल्यावर आईवडिलांना खूप समाधान वाटले, असे त्याने सांगितले.
मुळात युक्रेनमध्येही विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यासह सर्व विद्यार्थ्यांचीच काळजी घेतली होती. भारतीय दूतावासाचे मोठे सहकार्य लाभल्याने आम्ही सुरक्षित घरी पोहचलो असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. युक्रेनची परिस्थिती सुधारल्यास पुन्हा जाणार असल्याचेही त्याने सांगितले. मुलगा घरी सुखरूप परतल्याने ऋषभनाथच्या आई, वडील व बहिणीच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.