राजापूर : तालुक्यात कडक लॉकडाऊन असतानाही ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग चिंतेची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील जनतेने अधिक सतर्कता बाळगताना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे दिसून येताच कोरोना चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे.
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ झाली आहे. कडक लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाचे रूग्ण कमी होणे आवश्यक होते. मात्र, ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामध्ये काही रूग्णांना प्राथमिक लक्षणे दिसूनही औषध उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे. काहीजण जाणीवपूर्वक डॉक्टरकडे तपासणीसाठी जाणे टाळत आहेत. यातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. खास करून महिला कुटुंबात काम करताना असे आजार लपविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आता ग्रामीण भागातील जनतेने अधिक सतर्क होणे आवश्यक असून, अशाप्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास प्राधान्याने तपासणी करून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वराळे यांनी केले आहे.
------------------------
ग्रामपंचायत पातळीवर विलगीकरण कक्ष
तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढता संसर्ग लक्षात घेता, पंधराशे ते दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्थानिक आरोग्य प्रशासनाच्या सहकार्यातून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वराळे यांनी दिली. सद्यपरिस्थितीत कोंडसर बुद्रुक व कुंभवडे येथे असे विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. जेणेकरून गावपातळीवरच अशा रूग्णांना उपचार देणे शक्य होणार आहे.