लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाला, फळांची आवक रोडावली आहे. पावसाळ्यासाठी बेगमीची तयारी सुरू झाली असली तरी वाढत्या दरामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे.
कोरोनामुळे शासकीय निर्बंध असल्याने सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजी, फळे विक्री सुरू आहे. आसपासच्या जिल्ह्यातून भाज्या विक्रीला येत आहेत. दररोज होणारी आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. वाढते दर परवडेनासे झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडत आहे. पावसाळ्यासाठी तांदुळ, गहू, कांदे, कडधान्ये, डाळींची खरेदी करून ठेवण्यात येते. मात्र गेली दोन वर्षे लाॅकडाऊनचा सामना करताना, अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घाऊक खरेदी करण्याऐवजी हातात प्राप्त रकमेतूनच खरेदी करण्यात येत आहे. खाद्यतेलापासून डाळी, कडधान्ये, तांदळाचे दर कडाडले असल्याने बजेट जुळविणे अवघड बनले आहे.
तीव्र उन्हामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात पालेभाज्या, फळभाज्यांना वाढती मागणी असते. मात्र उत्पादनात घट झाली असल्याने दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची जुडी २० रुपये दराने विकण्यात येत आहे. कोथिंबीर जुडीच्या दरातही वाढ झाली आहे.
शरीरातील पाण्याची पातळी कमी हाेत असून थकवा जाणवत असल्याने लिंबूपाणी सेवन केले जाते. ‘क’ जीवनसत्त्व मुबलक असल्याने लिंबांना वाढती मागणी असून दहा रुपयांना दोन ते तीन नग दराने विक्री सुरू आहे.
उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन प्राधान्याने केले जाते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड सेवन फायदेशीर ठरते. २० ते २५ रुपये किलो दराने कलिंगड विक्री सुरू आहे. रमजानमुळे कलिंगडाला विशेष मागणी होत असून माल हातोहात संपत आहे.
पावसाळ्यासाठी बेगमीच्या जिन्नसांची खरेदी या दिवसात केली जाते. गतवर्षीपासून लाॅकडाऊन व त्यातच वाढती महागाई यामुळे दैनंदिन खर्च भागविणेच अवघड बनले आहे.
- प्रज्ञा चाळके, गृहिणी
कोरोनाचे संकट असतानाच महागाईने जीव मेटाकुटीस आणला आहे. खाद्यतेलाचे दर तर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे भविष्यात फोडणीशिवायच स्वयंपाक करावा लागणार आहे.
- रूपा गांगण, गृहिणी