रत्नागिरी : लाॅकडाऊन काळात कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने खरीप हंगाम हा महत्त्वाचा असल्याने शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवावे, असे आदेश कृषी आयुक्तालयाकडून २७ एप्रिल रोजी निघाले आहेत. मात्र, या आदेशाची रायगड व सांगली हे दोन जिल्हे वगळता अन्य कुठल्याही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लाॅकडाऊन केले आहे. मात्र, कृषी निविष्ठाविषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठा बंद आहेत. शेतकरी पारंपरिक पद्धतीची बियाणे साठवत नाहीत, संपूर्ण भातशेती ही कृषी सेवा केंद्रांवर अवलंबून असते. मात्र. सध्या अनेक कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. विविध नामवंत कंपन्यांची भात बियाणे मिळणारी ठिकाणे बंद असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.
शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये कृषी सेवा केंद्रे आहेत. सध्या या दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी आहे. चाळीस-पन्नास गावांतील शेतकरी या केंद्रांवर अवलंबून असतात. मात्र, वाहतूक व्यवस्था नसल्याने ते या वेळेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्य उपलब्ध होणे कठीण होणार आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊ शकतो. याची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी साहित्याचा अडथळारहित पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुसार शेतीशी निगडित असलेली कृषी सेवा केंद्रे चालू ठेवण्याबाबत व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतूक चालू ठेवण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवणे, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, इ कॉमर्स (ऑनलाईन विक्री) आदी पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होतील, यादृष्टीने स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. मात्र या आदेशांची अंमलबजावणी केवळ रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी केली असून कृषिविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिली आहे. अन्य जिल्हे याबाबत अजूनही अनभिज्ञच आहेत.
कोटसाठी
काही कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांचे नूतनीकरणही लाॅकडाऊन काळात झालेले नाही. त्यामुळे ते दोलायमान अवस्थेत आहेत. सध्याची गरज लक्षात घेऊन या परवान्यांना मुदतवाढ देण्यात यावी. लॉकडाऊनच्या परिणामामुळे रोजगार संपलेला आहे. याचा वेगळा परिणाम लागवडीखालील क्षेत्र वाढण्यावर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी कृषी सेवा केंद्रे पूर्णवेळ सुरू राहतील, याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
- प्रकाश बेर्डे, आधुनिक शेतकरी, देवडे (ता. संगमेश्वर)