लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६० हजाराकडे जाऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बालकेही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागली आहेत. यापैकी काहींना ‘एमएसआयसी’ (मल्टी सिस्टम इनफ्लेमेंटरी सिंड्रोम) चा धोका वाढला आहे. त्यामुळे यापासून या बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सजग झाली असून, अशा बालकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
पहिल्या लाटेत बालके बाधित होण्याचे प्रमाण कमी होते; मात्र दुसऱ्या लाटेत मोठ्यांबरोबरच बालकांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. जी बालके उपचार घेऊन बाहेर पडली आहेत, त्यापैकी काहींना ‘एमएसआयसी’ चा धोका होऊ शकतो, या शक्यतेमुळे आरोग्य विभाग दक्ष होऊन सर्वेक्षण करीत आहे.
अशी घ्या काळजी....
जी बालके कोरोनाबाधित झाली आहेत, अशा बालकांपैकी काहींना ‘एमएसआयसी’चा धोका निर्माण होऊ शकतो. यात काही मुलांना खूप ताप येणे आणि तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे अशी लक्षणे आढळतात. बाल रोग तज्ज्ञांच्या मते, कोरोनाबाधित झालेल्या १०० मुलांमागे अगदीच १-२ मुलांना ‘एमएसआयसी’चा त्रास संभवतो.
बालकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना मास्कशिवाय बाहेर पाठवू नये. आवश्यक असेल तरच त्यांना बाहेर पाठवावे. बाहेर गेल्यानंतर त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याविषयी खबरदारी घेण्यास सांगावे, तसेच वारंवार हात धुण्याची सवय लावावी. कोरोना होऊन गेलेल्या मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या बालकांमध्येही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठ्या व्यक्ती बाधित झाल्याने वाढले आहे; मात्र सर्वच मुले अगदी पूर्णपणे बरी होऊन बाहेर पडली आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही बालकांना ‘एमएसआयसी’ चा धोका संभवतो. जास्त वजन, दमा असलेल्या बालकांना होण्याची शक्यता असते; मात्र हे प्रमाणही अल्प आहे; मात्र तरीही या बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.
मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली जीवनसत्वे मिळणे गरजेची आहेत. ती त्यांना अधिकाधिक आहारातून देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फास्ट फूड, जंक फूड सद्यस्थितीत मुलांना देऊ नये, मुलांचे अवाजवी वजन वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे मुलांना व्यायामाची सवय करावी. सध्या खेळही थांबला आहे.