देवरुख (जि. रत्नागिरी) : गेल्या १७ वर्षांपेक्षा अधिक काळ ठेकेदार आणि प्रशासन यांच्यामुळे कोकणवासीयांचा पावसाळ्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास खडतर बनत आहे. महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात हे काम हाती घेण्यात आल्याने या भागातील रस्ता खचू लागला आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास धाेकादायक बनला आहे.महामार्गावरील धामणी येथे नदीलगत रस्ता रुंद करण्याच्या हेतूने नदीपात्राचा विचार न करता संरक्षण भिंत उभारण्याचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आले हाेते. सद्यस्थितीत या भिंतीचे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेले नसून बाजूने खोदलेला रस्ता आता खचू लागला आहे. संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या ताेंडावर हे काम का हाती घेण्यात आले, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. धामणी येथे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या ठिकाणी मातीचे छोटे-छोटे ढिगारे ओतून ठेवण्यात आले आहेत.
Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर धामणीजवळ रस्ता खचण्याचा धाेका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 1:44 PM