संकेत गोयथळे -- गुहागर -एखाद्या कामाचे उद्घाटन होते व काम सुरुही होते. ते काम पूर्णत्वास नेण्याअगोदर अनेक विघ्न येतात. अशावेळी ते काम मध्येच बंद झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानच्या तरुणांनी एका ध्येयाने एकत्र येत सुरु केलेले नदीतील गाळउपसा करण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास नेऊन तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. लोकसहभागातून केलेल्या या कामासाठी सुमारे ३ लाख ५ हजार रुपये खर्च झाला असून, यातून ८००० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गेले तीन-चार महिने संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईवरील उपाययोजनांमध्ये नदीनाल्यांतील गाळ काढणे हा पर्याय उपलब्ध आहे. पोमेंडी गावातील काही तरुणांनी एकत्र येत समृद्धी पोमेंडी प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली. पोमेंडी गावाच्या समृद्धीचे चित्र उभे करताना पाणी दुष्काळावर मात करण्याचे ठरवले. पाण्याशिवाय समृद्धी नाही, यासाठीच या तरुणांनी पुढाकार घेतला. नदीतील गाळउपशाचे काम सुरु केले आणि दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले. सुमारे ६०० मीटर लांब असलेल्या नदीतील गाळ उपसण्यात आला. यामुळे परिसरातील बायांचा डोह या जिवंत झऱ्याचे पुनर्जीवन झाले आहे. सर्वसाधारण ९ मीटर रुंद व १.५ (दीड) मीटर खोल याप्रमाणे ८१०० घनमीटर गाळ नदीतून काढण्यात या तरुणांना यश आले आहे. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे काम करण्यात आले. सुमारे ३ लाख ५ हजारांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला. गाळउपशाचे काम सुरु झाले आणि म्हणता म्हणता ३ लाख रुपये गोळा झाले. गेल्या १००-१५० वर्षांपासून नदीतील बायांच्या डोह या ठिकाणी गाळ साचला होता. दैवी प्रतिभा लाभलेल्या या ठिकाणाला स्वच्छ व सुंदर स्थान करण्याचा विडाच जणू या तरुणांनी उचलला आणि तो पूर्णही केला.तालुक्यात लोकसहभागातून प्रथम काम सुरु करण्याचा मान मिळालेल्या या गावाला प्रांताधिकारी रवींद्र हजारे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे कार्यवाह संजय यादवराव यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी या उपक्रमाला भेट देत कौतुक केले. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणाऱ्या ‘नाम’ संस्थेचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनीही या उपक्रमाला भेट देऊन या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. समृद्ध पोमेंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित विचारे, सचिव रुपेश विचारे, खजिनदार योगेश विचारे, सदस्य मिलिंद विचारे, दर्शन विचारे, श्रीकांत विचारे, संदेश विचारे, प्रतीक विचारे, संदेश विचारे, परशुराम विचारे यांच्यासह श्रीधर विचारे, बंटी विचारे, प्रमोद विचारे यांनी यासाठी परिश्रम घेतले.तरूणांचा आदर्श : सुशोभिकरण करणारअनेक ठिकाणी नदीनाल्यातील काढलेला गाळ कुठे टाकायचा, असा प्रश्न पडतो. त्यामुळे मग नदीपात्रातच तो बाजूला करुन ठेवला जातो. मात्र, या प्रतिष्ठानच्या तरुणांनी कल्पकतेचा वापर करत पुढील उपक्रम डोळ्यापुढे ठेवून हा गाळ सोमेश्वर मंदिराच्या आवारात टाकून सुशोभिकरण केले आहे.
नदीतील गाळ मंदिराच्या सौंदर्यासाठी
By admin | Published: June 21, 2016 12:52 AM