लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील केळवली हे दुर्गम गाव सुमारे साडेआठशे लोकवस्तीचे असून, अनेक वाड्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र, या गावाला उन्हाळ्याच्या दिवसात कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, मुंबईस्थित अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे या दोन ग्रामस्थांची नाळ कायमस्वरूपी गावाशी जोडलेली असल्याने त्यांच्या प्रयत्नातून आणि नाम फाऊंडेशनच्या महत्त्वपूर्ण सहकार्यातून या गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील नदी गाळमुक्त करून खऱ्या अर्थाने जलक्रांती केली आहे.
केळवली गावातील बहुतांश लोक मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्याला असून, सुटीच्या कालावधीत अधूनमधून गावाला ये-जा असते. मात्र, अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे यांचे सातत्याने गावी येणे होत असते. मार्च महिन्यापासून केळवलीला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या कालावधीत अनेक मुंबईकर गावी पाठ फिरवतात. मात्र अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे यांचे सातत्याने गावाला येणे असल्याने पाणीटंचाईवर काहीतरी मार्ग काढायला हवा, ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने अनेक गावांमधील नद्यांचा गाळ काढून पाणी समस्या दूर केल्याचे त्यांना माहीत होते. यातूनच या दोघांना प्रेरणा मिळाली व त्यांनी या संस्थेशी संपर्क केला. त्यात त्यांना यश आले. ‘नाम’चे मुख्य समन्वयक गणेश थोरात, कोकण विभागप्रमुख समीर जानवलकर यांच्याशी संपर्क साधून पूर्ण माहिती घेतली आणि ‘नाम’च्या सहकार्याने अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे यांच्या पुढाकाराने आणि केळवलीतील सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीतून मे २०१९पासून गावच्या नदीतील गाळ उपसा कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ ज्येष्ठ उद्योजक आर. डी. सामंत यांच्या हस्ते झाला.
नाम संस्थेने पोकलेन मशीन आणि त्यावर चालक दिला. डिझेलसह चालकाचे भोजन, राहण्याचा खर्च यासाठी ग्रामस्थांना ५-६ लाखांचा निधी आवश्यक होता. यावरही मात करत ग्रामस्थांच्या एकजुटीतून निधी उभा राहिला. विशेष म्हणजे युवकांबरोबरच गावातील ज्येष्ठ मंडळीही श्रमदानासाठी पुढे सरसावली. अतिशय दुर्गम भागात असूनही ग्रामस्थांनी अहाेरात्र केलेल्या परिश्रमातून गावातील नदी, नाले यांची स्वच्छता झाली. गाळ काढून रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. ‘नाम’च्या मदतीने या गावात अन्य काही कामेही यापुढे करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमातून निधी...
डिझेलचा खर्च चालकाच्या खाण्या - पिण्याची, राहण्याची सोय यासाठी ग्रामस्थांना निधी उभा करणे क्रमप्राप्त होते. बंडू तावडे यांच्यासह मुंबईतील मंडळींनी यासाठी मुंबईला दोन मोठे कार्यक्रम आयोजित केले. यातून ग्रामस्थ, मित्रमंडळी एकत्र आले आणि निधीसाठी मदतीचे हात पुढे आले. त्यामुळेच केळवली या दुर्गम गावाची पाणी समस्या दूर झाली.
अडीच कोटी पाणीसाठा
ग्रामस्थांची एकजूट आणि पै-पैचा आर्थिक लोकसहभाग यातून हे काम पूर्ण झाले आहे. गावात नदी-नाल्याचे २.५ किमीचे काम झाले असून, अंदाजे १ कोटी १२ लाख लीटर साठा झाला आहे. गावापासून २ कि. मी. अंतरावर सह्यादीच्या पायथ्याशी केलेल्या तलावात १ कोटी ३४ लाख लीटर असे एकूण २ कोटी ४६ लाख लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
आधारस्तंभ हरपला...
मे २०१९मध्ये या मोहिमेला सुरूवात झाली. कोरोना काळ असल्याने लाॅकडाऊन सुरू होते. त्यामुळे अनेक अडथळे आले. त्यावरही केळवलीतील मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी मात केली. गावचे आधारस्तंभ असलेले मुंबई मंडळाचे अध्यक्ष शिवाजी तावडे यांचे कोरोनाने निधन झाले. या परिस्थितीतही ग्रामस्थांनी धीर न सोडता काम केले.