अरुण आडिवरेकर रत्नागिरी : खरं तर साध्या पाण्याची नदीही वर्षभर वाहताना दिसत नाही. पण दापोली तालुक्यातील एका गावात मात्र वर्षभर वाफाळलेल्या पाण्याची नदी वाहते. विश्वास नाही ना बसत? पण हे खरं आहे. दापोली तालुक्यातील उन्हवरे या गावात चक्क वाफाळलेली नदी वाहत आहे. हे पाणी गंधकमिश्रित असल्याने ते गरम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल आठ ठिकाणी अशी गरम पाण्याची कुंडे आहेत.
कोकणातील ‘मिनी महाळेश्वर’ अशीच दापोलीची खरं तर ओळख. या तालुक्यात हुडहुडी भरवणारी थंडीही पडते आणि धो-धो पाऊसही पडतो. याच तालुक्यात ही गरम पाण्याची नदी मात्र अखंडपणे वाहते आहे. दापोली शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर उन्हवरे हे गाव नदीच्या काठावर वसलेले आहे. याच ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. या कुंडामुळे हे ठिकाण नावारूपाला आले आहे. गरम पाण्याच्या कुंडातील पाण्याचे तापमान ७० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. या कुंडातील पाणी झऱ्याच्या रूपाने वाहत असून, या वाहत जाणाऱ्या पाण्यामुळे सुमारे १० किलोमीटरची वाफाळलेली नदीच तयार झाली आहे. या वाफाळलेल्या नदीत पाय घातल्यास नक्कीच चटका बसतो. जमिनीतून वर येणाऱ्या या पाण्यात गंधकाचे प्रमाण अधिक आहे.उन्हवरे याठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहे. निसर्गात ढवळाढवळ न करता येथे विकास केला पाहिजे. या गरम पाण्यामुळे आजूबाजूच्या जमिनीवर कोणताच परिणाम होत नाही. गंधक पाण्यात मिसळत असल्याने ते गरम होते. - सुधीर रिसबूड, इतिहास संशोधक, रत्नागिरी