चिपळूण : येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना अशी महाविकास आघाडी झाली. यानंतर हा पॅटर्न राज्यात अन्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून राबविण्यात येऊ लागला. यानुसार गेल्या सव्वा वर्षापूर्वी येथील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत तो राबविण्यात आला.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या येथील नेत्यांच्या बैठकीत सव्वा वर्षे सेनेचा, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला संधी देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार या पदासाठी सव्वा वर्षापूर्वी सभापती म्हणून शिवसेनेच्या धनश्री शिंदे, तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पांडुरंग माळी यांची वर्णी लागली.राष्ट्रवादीकडून या पदासाठी दोनजण इच्छुक असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सभापती पदासाठी रिया कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण पवार यांनी काम पाहिले.या निवडीनंतर आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंत खताते, माजी सभापती शौकत मुकादम, पूजा निकम, इब्राहिम दलवाई, पांडुरंग माळी, सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, राजू जाधव, विकास गमरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.राष्ट्रवादीकडून दोन नावेसव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर धनश्री शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आताच्या सव्वा वर्षासाठी हे पद राष्ट्रवादीला देण्यात आले असून, या पदासाठी सदस्या रिया कांबळे यांच्यासह समीक्षा घडशी यांचे नाव पुढे आले होते.अनुजा चव्हाण बेदखलशिवसेनेच्या सदस्या अनुजा चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी फारशी दखलही घेतलेली नाही. गटनेते राकेश शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीला त्या उपस्थित होत्या. त्यानंतर सभापती निवडीसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीचा धर्म पाळून सभापती पदासाठी रिया कांबळे यांना पाठिंबा दिला.